Shubman Gill Punjab Vijay Hazare Trophy Squad : 2025 मधील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास आता पूर्ण झाला असून, नव्या वर्षात टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरणार आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आधी एकदिवसीय (ODI) आणि त्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) मालिका खेळणार आहे. ODI मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नसली, तरी T20I संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या टी-20 संघात शुभमन गिलला स्थान मिळाले नाही. गेल्या काही काळात टी-20 या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे गिलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जाते. त्यामुळे टी-20 संघ जाहीर होताच गिलच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Continues below advertisement

मात्र, गिलला मिळाली नवी संधी!

टी-20 संघात स्थान न मिळाले असले, तरी शुभमन गिलला आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे. मात्र ही संधी भारतीय संघात नव्हे, तर विजय हजारे ट्रॉफीसाठी आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली असून, त्यामध्ये भारताचे तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.

Continues below advertisement

गिल, अभिषेक आणि अर्शदीप यांना पंजाबकडून संधी

पंजाबचा स्पर्धेतील पहिला सामना 24 डिसेंबर रोजी महाराष्ट्राविरुद्ध होणार आहे. या तिघांसह पंजाबने पॉवर-हिटर्स आणि अष्टपैलू खेळाडूंनी सजलेला समतोल संघ निवडला आहे. विकेटकीपर-फलंदाज प्रभसिमरन सिंग, नमन धीर, अनमोलप्रीत सिंग, रामनदीप सिंग, सनवीर सिंग आणि हरप्रीत बराड हेही संघाचा भाग आहेत. तर वेगवान गोलंदाजीची धुरा गुरनूर बराड आणि क्रिश भगत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पंजाबचा कर्णधार कोण? सस्पेन्स कायम

पंजाब संघाची घोषणा झाली असली, तरी अद्याप कर्णधाराच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे कर्णधारपदाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग हे संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असतील की नाही, याबाबतही सध्या स्पष्टता नाही. भारतीय संघाला 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची ODI मालिका खेळायची आहे, त्यानंतर 21 जानेवारीपासून पाच सामन्यांची T20I मालिका सुरू होईल. शुभमन गिलला अलीकडेच T20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय T20 संघातून वगळण्यात आले होते. मात्र ODI संघात तो कर्णधाराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. तर अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग हे भारतीय T20I संघाचा भाग आहेत.

जयपूरमध्ये रंगणार पंजाबचे लीग सामने

मागील हंगामात पंजाब संघ विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला होता. 2024-25 हंगामात अर्शदीप सिंग हा पंजाबचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. यंदा पंजाब संघ आपले सर्व सात लीग सामने जयपूरमध्ये खेळणार आहे. पंजाबच्या गटात छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आणि मुंबई यांसारख्या संघांचा समावेश आहे. लीग टप्प्यातील सामने 8 जानेवारी रोजी संपणार असून, ते भारत-न्यूझीलंड ODI मालिकेच्या अवघ्या तीन दिवस आधी असतील.

विजय हजारे ट्रॉफीसाठी पंजाबचा संघ (Punjab's Vijay Hazare Trophy squad) -

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), हरनूर पन्नू, अनमोलप्रीत सिंग, उदय सहारन, नमन धीर, सलील अरोरा (यष्टीरक्षक), सनवीर सिंग, रमणदीप सिंग, जशनप्रीत सिंग, गुरनूर ब्रार, हरप्रीत ब्रार, रघु शर्मा, क्रिश भगत, गौरव चौधरी, सुखदीप बाजवा.