BCCI Test Incentive Scheme: इंग्लंडला (IND vs ENG) चितपट करत टीम इंडियानं (Team India) कसोटी मालिका जिंकली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या प्लेईंग 11 मधून टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू बाहेर होते. अशातच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं सर्वांनाच चकीत केलं. अशातच कसोटी मालिका खिशात घातल्यानंतर आता बीसीसीआयनंही (BCCI) टीम इंडियाला मोठी भेट दिली आहे. 


बीसीसीआयनं कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना अधिक मानधन देण्याची योजना आखली आहे. बीसीसीआयनं खेळाडूंसाठी प्रोत्साहन योजना लागू केली आहे. आता एका सीझनमध्ये 75 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 45 लाख रुपये मिळतील. तर एका सीझनमध्ये 50 ते 74 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रति सामना 30 लाख रुपये मिळतील. धर्मशाला कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर सचिव जय शाह यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली.


एका सीझनमध्ये सुमारे 10 कसोटी सामने खेळणाऱ्या कसोटीपटूला 1.5 कोटी रुपये (रु. 15 लाख प्रति सामना) संभाव्य सामना फी पेक्षा जास्त म्हणजेच, 4.50 कोटी रुपयांचे मोठं प्रोत्साहन मिळेल. याशिवाय अव्वल क्रिकेटपटूंना वार्षिक केंद्रीय करारांतर्गत 'रिटेनर फी' देखील मिळणार आहे.


BCCI 2022-23, 2023-24 सत्रांसाठी सुमारे 45 कोटी रुपये खर्च करणार : जय शाह 


काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं टीम इंडियासाठी खेळाडूंसोबत वार्षिक करार केला होता. त्यावेळी चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव या अनुभवी क्रिकेटपटूंना मात्र बीसीसीआयनं करार यादीतून वगळल्याचं पाहायला मिळालं. तर त्यांना गेल्या मोसमातील 'प्रोत्साहन' रक्कम दिली जाईल. जय शहा म्हणाले की, बीसीसीआय 2022-23 आणि 2023-24 सत्रांसाठी सुमारे 45 कोटी रुपये खर्च करेल.


जय शाह यांनी 2022-23 सीझनमधील 'टेस्ट क्रिकेट इन्सेंटिव्ह स्कीम'वर एक ट्वीटही केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, कसोटी सामन्यांसाठी सध्याच्या 15 लाख रुपयांच्या मॅच फीसाठी अतिरिक्त बक्षीस म्हणून काम करेल. हे प्रोत्साहन 2022-23 सीझनपासून पूर्वलक्षी असेल. ते घेणाऱ्या खेळाडूंवर देखील असेल."


रोहित शर्माचं मानधन किती असेल? 


जर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं 2023-24 सीझनमध्ये सर्व 10 कसोटी (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन, इंग्लंडविरुद्ध पाच) खेळल्या असतील, तर त्याला कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिल्याबद्दल 1.5 कोटी रुपये मॅच फी मिळेल. याशिवाय त्याला 4.5 कोटी रुपयेही मिळतील. अशा परिस्थितीत तो केवळ कसोटी क्रिकेटमधून 6 कोटी रुपये कमावणार आहे.


त्यात त्याची वार्षिक सात कोटींची रिटेनरशिपही जोडली तर त्याची कमाई 13 कोटी रुपये होईल. एका मोसमातील एकदिवसीय (8 लाख रुपये प्रति सामना) आणि टी-20 आंतरराष्ट्रीय (प्रति सामना 4 लाख) सामन्यांसाठी त्याला मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम वेगळी असेल. 


काही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला प्राधान्य न दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अलीकडे इशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांसारखे युवा खेळाडू रणजी ट्रॉफी सोडून आयपीएलच्या तयारीत व्यस्त होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयनं या निर्णयाद्वारे खेळाडूंचं लक्ष कसोटी क्रिकेटकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.