BCCI challenges ICC Pitch Rating : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) रेफरीच्या इंदोर पीच रेटिंगविरोधात दाद मागितली आहे. बीसीसीआय (BCCI) ने आयसासीचे (ICC) रेफरी ख्रिस ब्रॉड यांच्या निर्णयाला BCCI ने आव्हान दिलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, BCCI ने ICC कडे इंदूरच्या खेळपट्टीबाबत ब्रॉड यांच्या होळकर स्टेडिअमच्या खराब रेटिंगबद्दल (Indore Pitch Rating) अपील दाखल केलं आहे.


ICC ची समिती निर्णय देईल


ICC च्या नियमांनुसार, या अपीलवर ICC ची समिती निर्णय देईल. या समितीमध्ये ICC चे व्यवस्थापक वसीम खान, ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे आहेत. दरम्यान, गांगुलीला या प्रक्रियेतून वगळण्यात येईल कारण तो भारतीय असून BCCI ने ICC कडे दाद मागितली आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आयसीसी गांगुलीच्या जागी अन्य व्यक्तीची नियुक्त करेल.


इंदूरच्या खेळपट्टीबाबत अनेक


इंदूर येथील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात भारताचा नऊ विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यानंतर इंदूरच्या खेळपट्टीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दोन दिवसात 31 विकेट पडल्यामुळे आयसीसीकडून देखील या मैदानाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या मैदानाला आयसीसी मॅच रेफरीकडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळालं आहे. याच्याविरोधात बीसीसीआयने आता आयसीसीकडे दाद मागितली आहे.  


होळकर स्टेडियमची खेळपट्टी उत्तम नव्हती?


इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फारशी उत्तम नव्हती. कारण पहिल्या 30 मिनिटांत चेंडू खूप वळण घेत होता. या कसोटीच्या पहिल्या दिवशी 14 विकेट पडल्या तर दुसऱ्या दिवशी 16 फलंदाज बाद झाले. इंदूर कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 60.3 षटकात केवळ 163 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य दिले. 


यादरम्यान टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावले. त्याने 142 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लियॉनने बॉलसह आश्चर्यकारक कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात 8 बळी घेतले. त्याने पहिल्या डावात 3 बळी घेतले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि लेफ्ट आर्म स्पिनर मॅथ्यू कुहनेमन यांनी 1-1 विकेट घेतली.


ICC च्या खराब रेटिंगचा परिणाम काय?


आयसीसीच्या नियमांनुसार, बीसीसीआयकडे अपील करण्यासाठी 17 मार्चपर्यंतचा कालावधी होता. तसेच, जर एखाद्या स्टेडियमला पाच वर्षांच्या रोलिंग वेळेत 5 किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉईंट्स मिळाले, तर त्या स्टेडियमवर एक वर्षाची बंदी घालण्यात येते. म्हणजे, त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकत नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने आयसीसीकडे अपील केलं आहे.