INDW vs BANW Match Report : बांगलादेशच्या महिला संघाने अखेरच्या टी20 सामन्यात भारताचा पराभव करत व्हाईटवॉश टाळला आहे. तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत भारताने 2-1 च्या फराकाने विजय मिळवला आहे. आज झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने भारताचा 4 विकेटने पराभव केला. तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय महिला फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 103 धावांचे आव्हान ठेवले होते. बांगलादेशने हे आव्हान 18.1 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. बांगलादेशकडून शमीमा सुल्ताना हिने मॅचविनिंग खेळी केली.
भारताने दिलेल्या 103 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने आश्वासक सुरुवात केली. बांगलादेशकडून शमीमा सुल्ताना हिने 46 चेंडूत 42 धावांची मॅचविनिंग खेळी केली. या खेळीत शमीमा सुल्ताना हिने तीन चौकार लगावले. शमीमा सुल्ताना हिच्याशिवाय बांगलादेशच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. पण 103 धावांचा पाठलाग करत बांगलादेशने पहिल्या विजयाची नोंद केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. भारतीय संघाने पहिला आणि दुसरा टी20 सामना जिंकून मालिका आधीच खिशात घातली होती. आजच्या सामन्यात भारताकडून मिनू मनी आणि देविका वैद यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर जेमिमा रॉड्रिग्स हिने 1 विकेट घेतली.
प्रथम फलंदाजीचा निर्णय -
तिसऱ्या टी 20 सामन्यात हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 102 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून सर्वाधिक धावा कर्णधार हरमनप्रीत कौर हिने केल्या. हरमनप्रीत कौर हिने 41 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. त्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्स हिने 26 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 28 धावांचे योगदान दिले. या दोघींचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघातील सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. बांगलादेशकडून रबिया सुल्तान हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर सुल्ताना खातून हिने 2 विकेट मिळवल्या. त्याशिवाय नाहिदा अख्तर, फाहिमा खातून आणि शोरना अख्तर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.