West Indies vs India 2023, 1st Test Day 1 Stats Review : कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या अश्विन याने डोमिनिकामध्ये अव्वल कामगिरी केली. अश्विन याने पाच विकेट घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. अश्विन आणि जाडेजा यांच्या फिरकीसमोर वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावा आटोपला. त्यानंतर भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. टीम इंडियासाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हुकुमी एक्का ठरला. अश्विनने पहिल्याच दिवशी सहा मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पाहूयात त्याबाबत सविस्तर...
702 – आघाडीचा फिरकीपटू आर. अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेटचा टप्पा पार केला. अश्विनच्या नावावर सध्या 702 विकेटची नोंद आहे. 700 विकेटचा टप्पा पार करत अश्विन याने अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या यादीत स्थान पटकावले आहे. अनिल कुंबळे याने 956 तर हरभजनसिंह याने 711 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.
33 – अश्विन याने वेस्ट इंडिजविरोधात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजामध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट घेण्याचा कारनामा अश्विनने केला आहे. अश्विनने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकलेय. अँडरसन याने 32 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत.
5 – वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विनने हरभजनसिंह याची बरोबरी केली आहे. अश्विन आणि हरभजन सिंह यांनी पाच वेळा वेस्ट इंडिजविरोधात पाच विकेट घेतल्या आहेत.
95 – चंद्रपॉल याला त्रिफाळाचीत करत कसोटीमध्ये सर्वाधिक क्लिनबोल्ड करण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर जमा झाला आहे. अश्विनने कसोटीमध्ये आतापर्यंत 95 फलंदाजांना क्लिनबोल्ड केलेय. भारताकडून सर्वाधिकवेळा क्लिनबोल्ड करण्याचा विक्रम आता अश्विनच्या नावावर जमा झालाय. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. कसोटीत कुंबळेने 94 फलंदाजांना क्लिनबोल्ड केलेय.. त्याचा हा विक्रम आता अश्विनने मोडला आहे. कपिल देव यांनी 88 तर मोहम्मद शमी याने 68 फलंदाजांना क्लिनबोल्ड केलेय.
5 – चंद्रपॉल याला बाद करत अश्विन याने अनोखा विक्रम नावावर केला आहे. बाप आणि मुलाला बाद करण्याचा विक्रम अश्विनने आपल्या नावावर केला आहे. बाप आणि मुलाला बाद करणारा अश्विन भारताचा पहिला गोलंदाज ठरलाय. अश्विन याने 2011 मध्ये तेजनारायण चंद्रपॉल याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल याला बाद केले होते. आज 12 वर्षानंतर तेजनारायण चंद्रपॉल याला अश्विन याने तंबूचा रस्ता दाखवला. 2011 मध्ये अश्विनचे कसोटीमध्ये वेस्ट इंडिजविरोधात पदार्पण झाले होते. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी शिवनारायण चंद्रपॉल लयीत होता. कसोटीच्या दुसऱ्या डावात अश्विनने शिवनारायण चंद्रपॉल याला 47 धावांवर lbw बाद केले होते. आता मुलगा तेजनारायण चंद्रपॉल याला अश्विन याने तंबूत धाडलेय. बाप आणि मुलाला बाद करणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरलाय.
3 – अश्विन याने वेस्ट इंडिजमध्ये तिसऱ्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. वेस्ट इंडिजमध्ये पाच विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विनने सुभाष गुप्ते, हरभजन सिंह, अनिल कुंबळे आणि इशांत शर्मा यांची बरोबरी केली आहे. या गोलंदाजांनीही तीन वेळा वेस्ट इंडिजमध्ये पाच विकेट घेतल्या आहेत.