Ravichandran Ashwin Test Record: डोमिनिका कसोटीच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचा (Team India) दबदबा होता. टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) विंडीज विरुद्धच्या पहिल्या दिवशीच अनेक विक्रम रचले. त्यानं एक नाही, दोन नाही, तर तब्बल पाच विकेट्स घेतले. याच सामन्यात अश्विननं अनेक विक्रमही आपल्या नावे केले. 


डोमिनिका कसोटीत अश्विननं वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉलला आऊट केलं. तेजनारायण चंद्रपॉल अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यासोबतच अश्विननं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू अश्विन हा पिता-पुत्र दोघांनाही कसोटीत बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी 2011 मध्ये रवी अश्विननं तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांना आऊट केलं होतं. आणि कालच्या कसोटी सामन्यात अश्विननं त्यांचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉलला आऊट केलं. 


असं करणारा पहिला भारतीय गोलंदाज आर. अश्विन


अश्विन टेस्ट फॉरमॅटमध्ये बाप-लेकाला आऊट करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय गोलंदाजानं बाप-लेकाना आऊट करण्याचा कारनामा केलेला नव्हता. तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू. तेजनारायण चंद्रपॉल यांनी टेस्ट, नवडे आणि टी20 तिनही फॉरमॅटमध्ये विंडीजचं प्रतिनिधीत्व केलं आहे. शिवनारायण चंद्रपॉल यांनी वेस्ट इंडिजसाठी 164 कसोटी सामने खेळले आहेत. तर त्यांनी 268 वनडे सामन्यांमध्ये कॅरेबियन टीमचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यासोबतच वेस्ट इंडीजसाठी 22 टी20 सामनेही खेळले आहेत.  






तेजनारायण चंद्रपॉल कोण? 


वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल यांचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल. यानं विंडीजसाठी आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, आतापर्यंत तेजनारायण चंद्रपॉलला वनडे आणि टी20 खेळण्याची संधी मिळालेली नाही. तेजनारायण चंद्रपॉलनं विंडीजसाठी 6 कसोटी सामने 453 धावा केल्या आहेत. आतापर्यंत या खेळाडूनं 1 शतक, 1 दुहेरी शतक आणि एक अर्धशतक केलं आहे. त्यासोबतच टेस्ट फॉरमॅटमध्ये तेजनारायण चंद्रपॉलची एव्हरेज 45.3 आणि स्ट्राइक रेट 42.42 आहे. टेस्ट फॉरमॅटचा सर्वाधिक स्कोअर 207 धावांचा आहे. तेजनारायणनं 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटीत पदार्पण केलं होतं. 


अश्विनच्या फिरकीत अडकले वेस्ट इंडिजचे खेळाडू 


डोमिनिका टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी बँटिंग करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेला वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि जाडेजा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अगदी तुटून पडले. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 47 धावा एलिकनं केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट अवघ्या 20 धावा करुन माघारी परतला. तेजनारायण चंद्रपॉल 12 धावांवर आऊट झाला, तर कॉर्नवाल 19 धावांवर नाबाद राहिला. 


टीम इंडियासाठी अश्विननं 24.3 ओव्हर्समध्ये 60 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतले. त्यानं 6 मेडन ओव्हरही काढले. अश्विनसाठी हा डाव अत्यंत खास होता. त्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाच्या स्टार स्पिनरनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवलं, त्यासोबतच त्यानं 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केले. रवींद्र जाडेजानं 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं 7 मेडन ओव्हर्स काढले. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनंही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs WI 1st Test: डोमिनिका कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावे; अश्विनची फिरकी, तर रोहित-यशस्वीची भागिदारी विंडिजवर भारी