नवी दिल्ली : बांगलादेशनं दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला 2-0 असं पराभूत केलं.  बांगलादेशनं या कामगिरीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर केला.पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानांवर दोन कसोटी सामन्यात पराभूत करत बांगलादेशनं इतिहास रचला.  पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशनं पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयामुळं बांगलादेशच्या संघाचं मनोबल वाढलं आहे. ते आता भारताविरुद्ध लढण्यास सज्ज झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये याच महिन्यात कसोटी मालिका होणार आहे. 


पाकिस्तानला लोळवलं आता भारताला आव्हान देणार


भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यातील पहिली मॅच चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. तर, दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ती कसोटी कानपूरमध्ये होणार आहे. बांगलादेशनं पाकिस्तान विरुद्ध दमदार कामगिरी केली. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यात त्यांना यश आलं. आता बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांचं भारतासमोर आव्हान असेल. 


WTC रँकिंगमध्ये बांगलादेश चौथ्या स्थानी 


पाकिस्तानला दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभूत स्वीकारावा लागल्यानं त्यांची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत घसरण झाली आहे. पाकिस्तान आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, बांगलादेशनं या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत   या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेशला पराभूत करत पहिलं स्थान आणखी भक्कम करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.  भारतानं यापूर्वी दोन वेळा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं होतं. भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद देखील मिळवून देण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.


भारत आणि बांगलादेश कसोटी मालिका वेळापत्रक 


पहिली कसोटी : 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई


दुसरी कसोटी : 27  सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर , कानपूर 


दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी 20 मालिका पार पडणार आहे. भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्मा करत आहे. तर, टी 20 सामन्यांमध्ये भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे. 


इतर बातम्या :


Ajay Ratra : BCCIची मोठी घोषणा! अजित आगरकरच्या टीममध्ये नव्या सदस्याची एन्ट्री, कोण आहे अजय रात्रा?


Pak vs Ban : 'पाकिस्तान क्रिकेटसाठी काळा दिवस...', ​​बांगलादेशविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूचा संताप