T20 World Cup 2024 : आगामी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. पण त्याआधीच संघातील खेळाडूंमध्ये वाद असल्याचं समोर आले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इमाद वसीम (babar azam imad wasim fight) यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचं समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये दोन खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट संघाच्या एका ट्रेनिंग कॅम्पमधील आहे. 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत बाबर आझम आणि इमाद वसीम यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु असल्याचं दिसत आहे. एकमेंकाकडे हातवरे करत दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अद्याप संघाची घोषणा केली नाही. खेळाडूंचा ताळमेळ व्यवस्थित झाल्यानंतरच विश्वचषकासाठी संघ निवडला जाईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं होतं. त्यातच आता बाबर आझम आणि इमाद वसीम यांच्यातील वादाचा व्हिडीओ समोर आलाय. विश्वचषकाआधी पाकिस्तानच्या संघात दोन गट पडलेत का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. 






इमाद वसीमकडून स्पष्टीकरण - 


सोशल मीडियावर बाबर आझम आणि इमाद वासीम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यामुळे स्पष्टीकरणही द्यावं लागलं. इमाद वसीम यानं याबाबत स्पष्टीकरण दिलं. इमाद वसीम यानं एका मुलाखतीत सांगितलं की, " बाबर आझम आणि माझे संबंध चांगले नाहीत, असे माध्यमांमध्ये बोलले जात आहे. पण आमची मैत्री खूप चांगली आहे. आम्ही एकत्र बसून खातो. आमच्यात एक टक्काही शत्रुत्व नाही. तुम्ही मोहम्मद आमिर आणि बाबर आझम यांना याबाबत विचारु शकता."


टी20 विश्वचषकाआधी पाकिस्तानचं वेळापत्रक


दोन जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड आणि आयर्लंडविरोधात टी20 मालिका खेळणार आहे.  आयर्लंडविरोधात पाकिस्तान संघ 10 मे पासून टी20 मालिका खेळणार आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. तर इंग्लंडविरोधात 22 मेपासून चार सामन्याची टी20 मालिका ङोणार आहे. टी20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ अ गटामध्ये आहे. पाकिस्तानशिवाय भारत, कॅनडा, आयर्लंड, यूएसए संघाचा समावेश आहे. पाकिस्तानचा पहिला सामना सहा जून रोजी होणार आहे.