India Women vs Australia Women: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं भारतीय महिला संघाचा दारुण पराभव केला आहे. सलामी फलंदाज बेथ मूनी हिच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा नऊ गड्यांनी पराभव केला. भारतानं दिलेलं 173 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियनं एक गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू राखून पार केलं. या विजयासह दोन सामन्याच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 ने आघाडी घेतली आहे.
नवी मुंबईतील डी वाय पाटील येथे झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं भारताचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाची सलामी फलंदाज बेथ मूनी हिच्या तुफानी फटकेबाजीपुढे भारतीय गोलंदाजांनी नांगी टाकली. बेथ मूनी हिने 57 चेंडूत 16 चौकारासह नाबाद 89 धावांची खेळी केली. कर्णधार आलेसा हेली हिने 37 धावांची छोटेखानी खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि दोन षटकार लगावले. थाहिला मॅग्राथ हिने 29 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. बेथ मूनीच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 173 धावांचं आव्हान 11 चेंडू आणि 9 गडी राखून पार केले. भारताकडून दिप्ती शर्मानं एकमेव विकेट घेतली.
नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा केल्या होत्या. अष्टपैलू दिप्ती शर्मानं 15 चेंडूत 36 धावांची खेळी केली. यादरम्यान तिने 8 चौकार लगावले. ऋचा घोषने 20 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋचा घोषने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. देविका वैद्यने 24 चेंडूत 25 धावांची खेळी केली. स्मृती मंधानाने 22 चेंडूत 28 धावांचं योगदान दिले. शेफाली वर्माने दहा चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 21 धावा केल्या.
हे देखील वाचा-