India vs Australia Perth 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज (22 नोव्हेंबर) सुरुवात झाली असून पहिला सामना पर्थमध्ये खेळला जात आहे. या सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर होता आणि फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचा प्रथम फ्लॉप शो पाहिला मिळाला आणि पाहुणा संघ केवळ 150 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही विशेष काही करू शकले नाहीत आणि 67 धावांत 7 गडी गमावले. पहिल्या डावातील धावसंख्येच्या आधारे ऑस्ट्रेलिया अजूनही टीम इंडियापेक्षा 83 धावांनी मागे आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आपले खातेही उघडू शकली नाही आणि तिसऱ्याच षटकात आऊट झाला. यानंतर देवदत्त पडिक्कलही काही करू शकला नाही आणि भारतीय डावातील दुसरा फलंदाज एकही धाव न काढता बाद झाला. विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिला आणि त्याच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या. सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या केएल राहुलने काही काळ टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण तोही 74 चेंडूत 26 धावा करून बाद झाला.
नितीश रेड्डी आणि ऋषभ पंतने वाचवली भारताची लाज
ध्रुव जुरेलला त्याच्या चांगल्या फॉर्मचा फायदा घेता आला नाही आणि तो 11 धावा करून आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदरनेही निराशा केली आणि त्याच्या बॅटमधून केवळ 4 धावा आल्या. येथून ऋषभ पंत आणि नवोदित नितीश रेड्डी यांनी 48 धावा जोडून धावसंख्या 121 पर्यंत नेली. शेवटची विकेट म्हणून बाद होण्यापूर्वी नितीशने झटपट धावा केल्या आणि 59 चेंडूंत 41 धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि एक षटकार आहे. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी केला कहर
भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहचा कहर ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीलाच पाहायला मिळाला. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात केवळ 10 धावा करू शकणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला त्याने प्रथम बाद केले. उस्मान ख्वाजाही 8 धावा करून बाद झाला, तर स्टीव्ह स्मिथ खातेही उघडू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. ट्रॅव्हिस हेडने 11, तर मिचेल मार्शने 6 धावा केल्या.
डावाच्या सुरुवातीला जीवदान मिळालेल्या मार्नस लॅबुशेनला त्याचा फायदा उठवता आला नाही आणि 52 चेंडूत केवळ 2 धावा करून तो बाद झाला. कर्णधार पॅट कमिन्सच्या बॅटमधून 3 धावा आल्या. ॲलेक्स कॅरी 19 धावा केल्यानंतर क्रीजवर हजर आहे, तर मिचेल स्टार्कने 32 धावा केल्या आहेत. भारतासाठी जसप्रीत बुमराहने आतापर्यंत डावात सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद सिराजने दोन आणि हर्षित राणाने एक यश मिळविले आहे.
हे ही वाचा -