Australia vs India 1st Test Perth : पर्थ कसोटीत पहिल्या डावात टीम इंडियाचे शेर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांसमोर अवघ्या 150 धावांवर ढेर झाले. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 150 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मिचेल मार्शलाही दोन बळी मिळाले. भारताकडून नवोदित नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या.






6 बदल केले तरीही टीम इंडियाने पत्करली  शरणागती


भारतीय संघ या सामन्यात 6 बदलांसह मैदानात उतरला आहे. या सामन्यात भारताने नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना पदार्पणाची संधी दिली आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल हे देखील या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करत आहेत. भारताने न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत शेवटची कसोटी खेळली तेव्हा रोहित शर्मा, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, सर्फराज खान आणि आकाश दीप प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत होते, जे पर्थमध्ये खेळत नाहीत.


बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 ची सुरुवात पर्थ कसोटीने झाली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले, पण त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वालला खातेही उघडता आले नाही. यानंतर देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 5 धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. या वेळी केएल राहुलने एक टोक धरले आणि हळूहळू संघाच्या खात्यात धावांची भर घातली.


ध्रुव जुरेल 11 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरलाही चार धावा करता आल्या. पंत आणि नितीश यांनी सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. कमिन्सने ही भागीदारी तोडली. पंत बाद होताच भारताचा डाव 150 धावांवर आटोपला. हर्षित राणा सात धावा करून बाद झाला तर बुमराह आठ धावा करून बाद झाला. 


हे ही वाचा -


Video : तब्बल 9 महिन्यांनी भेटली संधी, 23 चेंडू खेळले पण पाटी कोरीच; देवदत्तला देव तारणार का?


IPL 2025 चा थरार 'या' दिवशी रंगणार, BCCI ने पुढील तीन हंगामांच्या तारखा केल्या जाहीर, जाणून घ्या सर्वकाही