Highest Succesful Run Chase For Australia In WC : अफगाणिस्ताननं विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292  धावांचं आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे सलामीचा इब्राहिम झादरान हा विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला. त्यानं वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात ही कामगिरी बजावली. इब्राहिम झादराननं 143 चेंडूंत नाबाद 129 धावांची खेळी उभारली. याआधी समिउल्ला शिनवारीनं 2015 सालच्या विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध केलेली 96 धावांची खेळी हा अफगाणिस्तानचा आजवरचा वैयक्तिक उच्चांक होता. तो विक्रम झादराननं मोडीत काढला. त्यानं एक खिंड नेटानं लढवून अफगाणिस्तानच्या प्रत्येक फलंदाजासोबत छोटी-मोठी भागीदारी रचली. त्यामुळंच अफगाणिस्तानला 50 षटकांत पाच बाद 291 धावांची मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत विश्वचषकात 287 धावांचा यशस्वी धावांचा पाठलाग केलाय. त्यामुळे पाच वेळच्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाला या धावसंख्येचा पाठलाग करता येईल का ? याबाबत चर्चा सुरु आहे.



वर्ल्डकपमध्ये धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची आकडेवारी चांगली नाही. ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत 287 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करता आला नाही. 1996 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरोधात 287 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. वर्ल्डकपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात यशस्वी पाठलाग होय. ऑस्ट्रेलियाचा दुसरा यशस्वी रनचेस 272 इतका आहे. 199 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरोधात ऑस्ट्रेलियाने 272 धावांचा यशस्वी पाठलाग केला. 2007 मध्ये इंग्लंडविरोधात 248 धावांचा पाठलाग केला होता. 2003 मध्ये झिम्बाव्बेविरोधात 247 धावांचा पाठलाग केलाय. ऑस्ट्रेलियाला हे आकडे बदलण्यासाठी आजच्या सामन्यात 292 धावांचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. पण शक्य वाटत नाही. त्यामुळे आज अफगाणिस्तान संघाला आज विजय मिळण्याची शक्यता जास्त आहे. 






ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात - 


वानखेडे स्टेडिअवर 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाने आघाडीचे चार विकेट 51 धावांत गमावले आहेत. ट्रेविस हेड याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मिचेल मार्श 24 धावा काढून तंबूत परतला. या दोघांना नवीन उल हक याने तंबूचा रस्ता दाखवला. डेविड वॉर्नर आणि जोश इंग्लिश या दोघांना उमरजाई याने बाद केले. ऑस्ट्रेलियाची सर्व मदार ग्लेन मॅक्सवेल याच्यावर अवलंबून आहे. 10 षटकांचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावल्या आहेत.