AUS vs AFG, Innings Highlights : अफगाणिस्ताननं विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292  धावांचं आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे सलामीचा इब्राहिम झादरान हा विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला. त्यानं वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात ही कामगिरी बजावली. इब्राहिम झादराननं 143 चेंडूंत नाबाद 129 धावांची खेळी उभारली. याआधी समिउल्ला शिनवारीनं 2015 सालच्या विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध केलेली 96 धावांची खेळी हा अफगाणिस्तानचा आजवरचा वैयक्तिक उच्चांक होता. तो विक्रम झादराननं मोडीत काढला. त्यानं एक खिंड नेटानं लढवून अफगाणिस्तानच्या प्रत्येक फलंदाजासोबत छोटी-मोठी भागीदारी रचली. त्यामुळंच अफगाणिस्तानला 50 षटकांत पाच बाद 291 धावांची मजल मारता आली.


इब्राहिम जादरान याच्या शतकी खेळीच्या बळावर अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियापुढे 292 धावांचा डोंगर उभारलाय.  जादरान अफगानिस्तानसाठी विश्वचषकात शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरलाय. जादरान याने 143 चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 129 धावांची खेळी केली. त्याशिवाय राशिद खान याने अखेरीस वादळी फलंदाजी केली. राशीद खान याने 194.44 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 35 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूड याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत विश्वचषकात 287 धावांचा यशस्वी धावांचा पाठलाग केलाय.  


मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इब्राहीम जादरान याने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याशिवाय इतर फलंदाजांनी छोट्या छोट्या पण महत्वाच्या खेळी केल्या. त्यामुळे 292 धावांपर्यंत मजल मारली.


प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात ठिकठाक झाली. आठव्या षटकात पहिला झटका बसला. रहमनुल्लाह गुरबाज याने 21 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या विकेट्ससाठी इब्राहीम जादरान आणि रहमत शाह यांनी 83 धावांची भागीदारी केली. ग्लेन मॅक्सवेल याने शाह याला बाद करत ही जोडी फोडली. रहमत शाह याने 30 धावांचे योगदान दिले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी  इब्राहिम जादरान आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांच्यामध्ये 52 धावांची भागीदारी झाली. स्टार्कने ही जोडी फोडली. शाहीने 26 धावांचे योगदान दिले. 


त्यानंतर चौथ्या विकेटसाठी अजमतुल्ला ओमरझाई आणि इब्राहिम जादरान यांच्यात चांगली भागीदारी सुरू होती. पण 43व्या षटकात झम्पाने ओमरझाईला 22 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केला. त्यानंतर 46व्या षटकात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद नबीने 12 धावा केल्या. अशा प्रकारे अफगाण संघाने 45.3 षटकात 233 धावांवर 5 विकेट गमावल्या. पण त्यानंतर राशीद खान याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. राशिद खान याने 18 चेंडूमध्ये 35 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता.