IND vs AUS: सलग दुसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच गमावल्यानंतर कागांरूंसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. टीम इंडियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border–Gavaskar Trophy) वापसीसाठी कांगारूंना पुढचे दोनही कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. अशातच आता ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) अडचणीत सापडलेला असताना संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिचा कर्णधार पॅट कमिन्स (Australian captain Pat Cummins) अचानक मायदेशी परतला आहे. कमिन्सच्या अचानक मायदेशी परतण्यामागे वैयक्तिक कारणं सांगितली जात आहेत. मात्र, नेमकी कारणं अद्याप समोर आलेली नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी परतणार आहे. 


दोन कसोटी सामन्यांत कमिन्सनं घेतलेत फक्त 3 विकेट्स 


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची कामगिरीही तशी फारशी चांगली नव्हती. दोन कसोटी सामन्यांत 39.66 च्या सरासरीने त्यानं केवळ तिनच विकेट्स घेतल्यात. जर कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी सिडनीहून परत येऊ शकला नाही, तर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वात संघ तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्टीव्ह स्मिथ 2018 मध्ये सँडपेपर गेटपूर्वी संघाचा कर्णधार होता. 


टीम इंडियानं घेतला अपमानाचा बदला 


तब्बल सव्वा दोन वर्षांपूर्वी एडिलेड कसोटीत केवळ 36 धावांवर ऑलआउट झाल्यानंतर मेलबर्न कसोटीत दमदार वापसी टीम इंडियानं केली होती. अशीच काहीशी अपेक्षा भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियनं संघाकडून केली जात होती. परंतु, दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावांत कांगारूंना टीम इंडियानं चारी मुंड्या चीत करत कांगारूंच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. 


कसोटीत मालिकेत कांगारूंचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी 


नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात 91 धावांत गुंडाळल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीचा आलेख पुन्हा नीचांकाकडे सरकला. कसोटीच्या तिसर्‍या दिवशी क्रिकेटच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाला टीम इंडियानं पराभूत केलं. भारतीय फिरकीपटूंना स्वीप आणि रिव्हर्स स्वीप करण्याची ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रणनीती फारशी चालली नाही. रविवारी दुसऱ्या डावात 61/1 धावांच्या पुढे खेळायला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 113 धावांवर गारद झाला. सकाळच्या सत्रात 87 मिनिटांच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा संघानं केवळ 48 धावांत नऊ विकेट्स गमावल्या. टीम इंडियानं 63 वर्ष दिल्लीत एकही कसोटी न गमावण्याचा विक्रम कायम राखला.