(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS: ऑस्ट्रेलियानं 146 वर्षांत पहिल्यांदाच उतरवला असा संघ, दिल्ली कसोटीत प्लेईंग 11 मध्ये केला ऐतिहासिक बदल
Delhi Test : ऑस्ट्रेलिया संघानं 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यावेळीच कसोटी सामन्यांत केवळ एका गोलंदाजासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कसोटीत एकूण 4 फिरकीपटूंना संधी दिली गेली आहे.
IND vs AUS, 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Delhi Test) खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कांगारू संघाने फिरकीपटूंवर अधिक भरवसा दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनवर नजर टाकली तर कांगारूंचा संघ केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. तो वेगवान गोलंदाज स्वतः कॅप्टन पॅट कमिन्स आहे. 146 वर्षांच्या कसोटी इतिहासात केवळ एकाच वेगवान गोलंदाजासह ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्यात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
1998 आणि 2017 मध्ये वेगवान गोलंदाजासोबत खेळलो
आकडेवारीवर नजर टाकली तर 1998 साली इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेतील एका सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ फक्त एक वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला होता. 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातही असेच दृश्य होते. पण 1998 आणि 2017 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघात असे काही खेळाडू होते जे मध्यम गतीने गोलंदाजी करू शकत होते. 1998 मध्ये, कॉलिन मिलर कसोटी सामन्यात ग्लेन मॅकग्रासोबत होता. त्याच वेळी, 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हिल्टन कार्टराईट ऑस्ट्रेलियन संघात पॅट कमिन्ससोबत होता. मात्र भारताविरुद्धच्या दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक बदल आहे.
ऑस्ट्रेलियन संघात 4 फिरकीपटूंचा समावेश
दिल्लीत खेळल्या जात असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात चार फिरकीपटूंचा समावेश केला आहे. प्लेईंग इलेव्हनकडे पाहता कांगारू संघात नॅथन लियॉन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन हे फिरकीपटू म्हणून खेळत आहेत. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड हा देखील अष्टपैलू फिरकी गोलंदाज आहे. या फिरकीपटूंशिवाय दुसऱ्या कसोटीत कांगारू संघात वेगवान गोलंदाज म्हणून फक्त पॅट कमिन्स आहे.
दिल्लीत टीम इंडियाचाच दबदबा
1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दिल्लीत खेळल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला आहे. 1959 पासून कागारुंचा संघ विजयाची वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळला गेला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सनी कांगारुंचा पराभव केला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 14 बळी घेत टीम इंडियासाठी मोठ्या विजयाचा पाया रचला होता.
हे देखील वाचा-