Australian Cricket Team : युएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियानं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेटनं पराभव करत चषकावर कब्जा केला. फिंचच्या नेतृत्वाली ऑस्ट्रेलिया संघानं दुबईत इतिहास रचलाय. या विजयासह ऑस्ट्रेलियानं क्रिकेट जगतावरील आपला दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाकडे सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे आयसीसीच्या 8 ट्रॉफी आहेत. एकदिवसीय आणि कसोटीशिवाय टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियानं आपला दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलेय. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषकावर पाच वेळा, आणि चॅम्पियन ट्रॉफीवर दोन वेळा नाव कोरलेय. ऑस्ट्रेलिया 1987, 1999, 2003, 2007, 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे चॅम्पियन झाले होते. 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता टी-20 मध्येही चषकावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाकडे आयसीसीच्या सर्वाधिक 8 ट्रॉफी आहेत. त्यानंतर भारत आणि वेस्ट विडिंजकडे प्रत्येकी पाच-पाच ट्रॉफी आहेत.
टी-20 मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन -
ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन झालाय. 2007 पासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात झाली. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यावेळी ऑस्ट्रेलियानं कोणतीही चूक केली नाही.
टी – 20 विश्वचषकावर नाव कोरणारे संघ -
2007: भारत
2009: पाकिस्तान
2010: इंग्लंड
2012: वेस्ट विंडिज
2014: श्रीलंका
2016: वेस्ट विंडिज
2021 : ऑस्ट्रेलिया
फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांचा जलवा :
आयसीसी टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आणि दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. मिशेल मार्शने या सामन्यात 50 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या आणि या विजयात मोठा वाटा उचलला. तो या अंतिम सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरने सात सामन्यात 289 धावा केल्या आहेत. त्याच्या धावांची सरासरी ही 48.16 इतकी आहे तर स्ट्राईक रेट हा 146.70 इतका आहे. डेव्हिड वॉर्नरने या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तीन अर्धशतकं केली आहेत. आजच्या न्यूझीलंड विरोधातील अंतिम सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या आहेत.