भारतीय महिला क्रिकेट खऱ्या अर्थानं आता कात टाकतंय. कारण आज ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीला सुरुवात झाली. गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येत असलेल्या या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर आश्वासक सुरुवात केली. खराब हवामानामुळे पहिल्या दिवशी अवघ्या 44.1 षटकांचा खेळ झाला. पण तोपर्यंत भारताने एक बाद 132 धावा धावफलकावर लावल्या होत्या.


भारताची सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मानं 93 धावांची दमदार सलामी दिली. खेळ थांबला तेव्हा स्मृती 15 चौकार आणि एका षटकारासह 80 धावांवर तर पूनम राऊत 16 धावांवर खेळत होती.




क्विन्सलँडच्या करारा ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने आज नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण स्मृती आणि शफालीनं ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा नेटानं सामना केला. शफालीनं आपल्या आक्रमकतेला लगाम घालत खेळ केला. तिला तीन वेळा जीवदानही मिळालं. पण 31 धावांवर सोफी मॉनिल्यूक्सच्या चेंडूवर एक खराब फटका खेळण्याच्या नादात ती झेलबाद झाली. शफाली बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊतनं स्मृतीला चांगली साथ दिली. स्मृतीनही आपल्या कसोटी कारकीर्दीतलं तिसरं अर्धशतक साजरं केलं. 


दरम्यान महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रकाशझोतात खेळवला जाणारा हा दुसराच कसोटी सामना आहे. तर भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळत आहे. याआधीव ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 9 ते 12 नोव्हेंबर 2017 साली पहिला डे-नाईट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला होता.