David Warner Batting Records : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne ricket Ground) सुरु ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) सामन्यात वॉर्नरनं 200 धावा करत दुहेरी शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे त्याच हा 100 वा कसोटी सामना असून या सामन्यात त्याने द्विशतक झळकावत बरेच विक्रम नावावर केले आहेत. वॉर्नरनं आपल्या खेळीत 254 चेंडूत 200 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 16 चौकार आणि 2 षटकार निघाले.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी केवळ इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटला ही कामगिरी करता आली होती. त्याने 2021 मध्ये भारताविरुद्धच्या 100व्या कसोटीत 218 धावांची इनिंग खेळली होती.
सचिन तेंडुलकरशी बरोबरी
डेव्हिड वॉर्नरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर म्हणून 45 वं शतक झळकावलं. या शतकासह त्याने भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने सलामीवीर म्हणून आपल्या कारकिर्दीत 45 शतकं झळकावली आहेत. सचिनने वनडेमध्ये ही सर्व शतके झळकावली असली तरी. दुसरीकडे, वॉर्नरनं एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून 45 शतकं झळकावली आहेत.
100व्या वनडेतही झळकावलं होतं शतक
डेव्हिड वॉर्नरने कसोटीपूर्वी आपल्या 100व्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावलं होतं. त्याने 2017 मध्ये भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये शतक झळकावलं होतं. यासोबतच पाच वर्षांनंतर त्याने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या संस्मरणीय खेळीदरम्यान वॉर्नरनं आपल्या कसोटी कारकिर्दीत 8000 धावाही पूर्ण केल्या. मात्र, वॉर्नरने 200 धावा करताच त्याला क्रॅम्प येऊ लागला आणि त्याला दुखापतीमुळे पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
हे देखील वाचा-