(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2023: 'सूर्या'ला ही अखेरची संधी मिळणार, जाणून घ्या काय आहे कारण?
India Asia Cup Squad, Suryakumar Yadav : आशिया चषक 2023 साठी आज भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे
India Asia Cup Squad, Suryakumar Yadav : आशिया चषक 2023 साठी आज भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. आशिया चषकासाठी (Team India Asia Cup 2023 Squad) 17 शिलेदार निवडले जाण्याची शक्यता आहे. त्याच खेळाडूमधील 15 जण विश्वचषकासाठी निवडले जातील. आज भारतीय निवड समितीकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. मिडल ऑर्डरबाबतही संघाची भूमिका स्पष्ट होईल. राहुल आणि अय्यर यांच्या दुखापतीवरुनही पडदा उठेल. आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादव याला संधी दिली जाऊ शकते. सूर्याला ही अखेरची संधी असेल, असा अंदाज वर्तवला जातोय.
यंदाचा आशिया चषक वनडे फॉर्मेटमध्ये खेळवला जात आहे. पण वनडेमध्ये सर्याला अद्याप प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतरही वारंवार सूर्यकुमार यादवला संधी दिली जात आहे. आशिया चषकातही त्याला पुन्हा संधी दिली जाऊ शकते. राहुल आणि अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त नसतील तर सूर्याला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या वनडे मालिकेत सूर्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. तीन वनडेमध्ये त्याने 19, 24 आणि 35 धावांची खेळी केली.
आशिया चषकात का संधी ? काय आहे कारण..
वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 मालिकेत सूर्याने विस्फोटक फलंदाजी करत टीकाकारांची तोंडं बंद केली. त्याची आक्रमक शैली टी-20 मालिकेत पाहायला मिळाली. चार डावात फलंदाजी करताना त्याने दोन अर्धशतके झळकावली. सूर्याने चार डावात अनुक्रमे २१, १, ८३ आणि ६१ धावा केल्या. सूर्याची टी २० ची आक्रमक शैली टीम इंडिया वनडेमध्ये वापरण्याच्या मानसिकतेत आहे. सूर्याला फिनिशर म्हणून संधी दिली जाऊ शकते.
सूर्या आक्रमक फलंदाजी करण्यासाठी तरबेज आहे. त्याच्याकडे सेट झाल्यानंतर अवघ्या काही चेंडूंमध्ये सामना बदलण्याची क्षमता आहे. तो संघासाठी फिनिशरची भूमिकाही बजावू शकतो. आक्रमक फलंदाजीच्या शैलीमुळे सूर्या संघासाठी परिपूर्ण फिनिशर ठरू शकतो. त्यामुळेच विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादवला आशिया चषक 2023 मध्ये आणखी एक संधी द्यायला भारतीय संघ व्यवस्थापन विचार करत आहे.
वनडे करिअर कसे राहिले...
टी २० क्रिकेटचा बादशाह असलेल्या सूर्यकुमार यादवला वनडेमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नाही. सूर्याने २०२१ मध्ये वनडेत पदार्पण केले होते. २४ डावात 24.33 च्या सर्वसामान्य सरासरीने 511 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.