Asia Cup 2023, Shaheen Afridi On Virat Kohli : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोन सप्टेंबर रोजी सामना झाला. पण पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने या सामन्यात 266 धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यापुढे भारताचे फलंदाज ढेपाळले होते. 66 धावांत भारताने आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यासारख्या आघाडीच्या फलंदाजांना पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने तंबूत पाठवले होते. शाहीन आफ्रिदीने या सामन्यात 10 षटकांत 35 धावा खर्च करत चार विकेट घेतल्या होत्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विकेटचा समावेश होता. या दोघांनाही शाहीन याने त्रिफाळाचीत बाद केले होते. 


पाकिस्तानविरोधातील सामन्यापूर्वीच शाहीन आफ्रिदी भारतासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात होते. आफ्रिदीने ते सिद्धही करुन दाखवले. रोहित आणि विराटला बाद करत भारतीयांच्या हिरमोड केला होता. सामन्यानंतर शाहीन आफ्रिदी याला विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये शाहीन आफ्रिदीने विराट कोहलीचे तोंडभरुन कौतुक केले. विराट कोहली महान खेळाडूपैकी एक आहे, असे शाहीन म्हणाला. 






गुणतालिकेची स्थिती काय? 


शाहीन आफ्रिदीने आपल्या शानदार चेंडूवर विराट कोहलीला त्रिफाळाचीत बाद केले. त्याबाबत बोलताना तो म्हणाला की, विराट कोहली हा दिग्गज खेळाडू आहे. तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा आहे. पाकिस्तानविरुद्ध भरपूर धावा करण्यासोबतच त्याने आपल्या संघाला सामना जिंकून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे विराट कोहलीची विकेट महत्वाची होती.


सहा संघांना आशिया चषकात दोन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटामध्ये पाकिस्तान, भारत आणि नेपाळ यांचा समावेश आहे. या गटातून तीन गुणांसह पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. अ गटामध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ एका गुणासह दुसऱ्या क्रमांकवर आहे. टीम इंडियाचा अखेरचा साखळी सामना सुरु झाला आहे. भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणार का ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.  आशिया चषकातील ग्रुप ब मध्ये अटीतटीची स्पर्धा रंगली आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. पाच तारखेला श्रीलंका आणि आफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. या सामन्यानंतरच ग्रुप ब चे चित्र स्पष्ट होईल.  ग्रुप ब मध्ये श्रीलंका सध्या पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेश संघाने दोन सामन्यापैकी एक सामना जिंकलाय. बांगलादेशचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आफगाणिस्तान तळाशी आहे. आफगाणिस्तानने अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यास नेट रनरेटवर निकाल लागेल.