Ajinkya Rahane Syed Mushtaq Ali Trophy : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या या मोसमाचे विजेतेपद पटकावले. 2024 साली श्रेयसने प्रथम केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवले आणि नंतर त्याने मुंबईला मोठे यश मिळवून दिले. मुंबईला यंदाच्या हंगामात चॅम्पियन बनवण्यात संघासाठी सलामी देणाऱ्या अजिंक्य रहाणेची भूमिका महत्त्वाची होती.
अजिंक्य रहाणे केवळ त्याच्या संघासाठीच नव्हे तर या स्पर्धेतही सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या रहाणेला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. 36 वर्षीय रहाणेची ही कामगिरी खरोखरच आश्चर्यकारक होती आणि त्याने संपूर्ण हंगामात अप्रतिम फलंदाजी केली. अंतिम फेरीतही रहाणेने 30 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 37 धावांची उत्कृष्ट खेळी केली.
अजिंक्य रहाणेने केल्या सर्वाधिक धावा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामात त्याने एकूण 9 सामने खेळले आणि त्याच्या 8 डावात त्याने सर्वाधिक 469 धावा केल्या. रहाणेने या कालावधीत 5 अर्धशतके झळकावली आणि या कालावधीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 98 धावा होती. या सामन्यांमध्ये रहाणेची सरासरी 58.62 होती, तर त्याचा स्ट्राइक रेट 164.56 होता. रहाणेने या मोसमात 46 चौकार आणि 19 षटकारही मारले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईने मध्य प्रदेशचा 5 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन बनले. मुंबईने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले.
मुंबईसाठी सामन्याच्या शेवटच्या क्षणी सुर्यांशने अप्रतिम खेळी खेळली, त्याने 15 चेंडूत 240 धावांच्या स्ट्राईक रेटने 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 36 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात मुंबईसाठी सूर्यकुमार यादवनेही चांगली खेळी केली, मात्र त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. सूर्याने 48 धावा केल्या तर उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या रहाणेने 37 धावा केल्या. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने 10 धावा केल्या तर कर्णधार श्रेयस अय्यरने 9 चेंडूत 16 धावा केल्या. या सामन्यात अथर्व अंकोलकरनेही 6 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या आणि त्याने सुर्यांशला चांगली साथ दिली.
हे ही वाचा -