Australia vs India 3rd Test : ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ आपल्या स्कोअरमध्ये केवळ 40 धावांची भर घालू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी तिसऱ्या दिवशी प्रत्येकी एक बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवले. ॲलेक्स कॅरीने 70 धावांची खेळी खेळली, तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतके झळकावली. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्या, ज्याने एकूण 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. ॲलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांनी तिसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली केली, पण 18 धावांवर शॉट खेळताना स्टार्क आऊट झाला. ॲलेक्स कॅरीने एका टोकाला खंबीरपणे उभा राहिला, आणि 70 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्कला बाद करताना जसप्रीत बुमराहने तिसऱ्या दिवसाची पहिली विकेट घेतली. त्यानंतर मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी लागोपाठ षटकांत प्रत्येकी एक बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 445 धावांवर गुंडाळला.
भारताकडून बुमराहचा विकेटचा षटकार
भारताकडून सर्वाधिक यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह होता, त्याने एकूण 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बुमराहने कांगारू संघाचे दोन्ही शतकवीर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनाही बाद केले. ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी बुमराहने 5 बळी पूर्ण केले होते. दुसरीकडे मोहम्मद सिराजने 2, तर आकाशदीप आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे ही वाचा -
Abhijeet Katke : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो