Afghanistan Cricket Board name R Sridhar: अफगाणिस्तान क्रिकेट संघाने भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांचा समावेश केला आहे. रामकृष्णन श्रीधर अफगाणिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाले आहेत. मात्र अफगाणिस्तानने आर श्रीधर यांचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नव्हे तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून समावेश केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून रामकृष्णन श्रीधर यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्याबाबत माहिती दिली आहे.


अफगाणिस्तान (Afghanistan Cricket Board) भारत दौऱ्यात नोएडात न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. तर दक्षिण आफ्रिके विरुद्ध 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. आर. श्रीधर (R. Sridhar) या दोन्ही मालिकेत सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. याआधी अफगाणिस्तानने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी माजी भारतीय दिग्गज अजय जडेजाला मार्गदर्शक म्हणून समाविष्ट केले होते.


अफगाणिस्तान बोर्डाने पत्रात काय म्हटलंय?


अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय रामकृष्णन श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी राष्ट्रीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.






कोण आहे आर. श्रीधर-


भारतात 35 प्रथम श्रेणी आणि 15 लिस्ट-ए सामने खेळले आहेत. 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ते टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते, ज्यामध्ये एक वनडे विश्वचषक आणि 2 टी-20 विश्वचषकांचा समावेश होता. याशिवाय त्याने 2014 ते 2017 दरम्यान आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जसाठी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.


आर. श्रीधर यांची कारकीर्द-


आर. श्रीधर यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हैदराबादकडून खेळायचा. तो डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज होता. श्रीधरने 35 प्रथम श्रेणी सामन्यात 29.09 च्या सरासरीने 91 बळी घेतले. याशिवाय त्याने 40 डावात फलंदाजी करताना 574 धावा केल्या, ज्यात 1 अर्धशतकही आहे. 15 लिस्ट-ए सामन्यांमध्ये, त्याने 9 डावात फलंदाजी करताना 14 विकेट घेतल्या आणि 69 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 30 अशी होती. 


2012 मध्ये पहिला अफगाणिस्तानने खेळला सामना-


2012 मध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत पहिला एकदिवसीय सामना खेळला ज्यात त्यांचा 7 विकेट्सनी पराभव झाला. 2013 पर्यंत, अफगाण संघ आयसीसीचा सहयोगी सदस्य देखील बनला. 2017 मध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंडलाही कसोटी दर्जा मिळाला होता. कसोटी दर्जा मिळवणारा अफगाणिस्तान हा 11वा संघ ठरला तर आयर्लंड हा 12वा संघ ठरला. अफगाणिस्तानने भारताविरुद्ध 2018 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता.


संबंधित बातमी:


 T20 World Cup 2024 Afghanistan: देशात एकही मैदान नाही, सत्तापलट, भारताचा पाठिंबा, 8 महिन्यात उलटफेर; अफगाणिस्तानच्या जिद्दीचा विजय!