Afghanistan vs New Zealand Test : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी 9 सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक स्टेडियमवर सुरू होणार होती, परंतु दोन दिवस उलटून गेले आहेत आणि खेळ तर दूर अद्याप नाणेफेक देखील झालेली नाही. पहिल्या दिवशी ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर झाला आणि शेवटी संपूर्ण दिवस वाया गेला. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होणे अपेक्षित होते मात्र मैदान ओले असल्याने सलग दुसऱ्या दिवसाचा खेळ पाण्यात गेला.


मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसानंतर मैदान अधिक ओले झाल्याने तिसऱ्या दिवशी खेळ होण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांचे लक्ष सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्यावर आहे, जे मैदानाच्या ओल्या आउटफिल्डचे मूल्यांकन करतील आणि नंतर अहवाल देतील.


BCCI आणि अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये दोष कुणाचा? 


त्यामुळे आता ग्रेटर नोएडाच्या स्टेडियमच्या भवितव्याचा निर्णय मुख्यतः सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या अहवालावर अवलंबून असणार असणार आहे. स्टेडियममधील अशा त्रुटींसाठी अनेकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर दोष दिला जातो, परंतु यावेळी या अनियमिततेची संपूर्ण जबाबदारी यजमान अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर (ACB) आहे. BCCI ने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला पर्याय म्हणून बंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम आणि कानपूरचे ग्रीन पार्क स्टेडियम ऑफर केले होते, परंतु अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने कमी खर्च या मुद्द्यांना प्राधान्य देत हे ठिकाण निवडले.






ग्रेटर नोएडाचे क्रिकेट स्टेडियम पहिल्या दिवसापासूनच या गोंधळामुळे चर्चेत आहे. या स्टेडियममध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसा कव्हर पण नाहीत. त्यामुळेच कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी मैदान पूर्णपणे खेळासाठी तयार होऊ शकले नाही. उर्वरित काम अननुभवी ग्राउंड स्टाफने पूर्ण केले.


गेल्या काही वर्षांपासून ग्रेटर नोएडाचे क्रिकेट स्टेडियम केवळ आंतरराष्ट्रीय सामनेच नाही, तर देशांतर्गत सामनेही आयोजित करण्यात आले नाही. बीसीसीआयने 2019 पासून येथे कोणताही होम मॅच आयोजित केलेला नाही. येथील खराब परिस्थिती पाहता भविष्यात सामना आयोजित करण्याची शक्यता कमी आहे.


स्टेडियमवर लागणार बंदी ?


नोव्हेंबर 2023 मध्ये लागू झालेल्या ICC ‘पिच आणि आउटफिल्ड मॉनिटरिंग प्रोसिजर’ नुसार, ‘प्रत्येक सामन्यानंतर, सामनाधिकारी खेळपट्टी आणि आउटफिल्ड अहवाल फॉर्म ICC वरिष्ठ क्रिकेट ऑपरेटर व्यवस्थापकाकडे पाठवतील. हा अहवाल मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत आयसीसीचे वरिष्ठ क्रिकेट संचालक व्यवस्थापक ते यजमान मंडळाकडे पाठवतात आणि त्यांना स्टेडियमवर लावण्यात आलेल्या डिमेरिट गुणांची माहिती देतात. जर ग्रेटर नोएडा स्थळाला 6 किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळाले तर ते 12 महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यापासून निलंबित केले जाईल.