IND vs SA 3rd T20I Playing 11 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी खूपच चांगली झाली आणि संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी फेल ठरले आणि संपूर्ण संघ 124 धावांवर गारद झाला. दुसऱ्या सामन्यात अनेक भारतीय फलंदाजांची कामगिरी खराब राहिली, ज्यामध्ये सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा देखील होता. अभिषेक शर्माची गेल्या 7 सामन्यांपासून खराब कामगिरी कायम आहे. आता टीम इंडिया तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून अभिषेकला वगळू शकते की त्याच्यावर विश्वास दाखवेल, हा प्रश्न आहे.


अभिषेकच्या सततच्या खराब कामगिरीनंतर अनेकांना वाटत असेल की त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल, पण तसे होणार नाही. नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघाकडे पाहिले तर सलामीवीर म्हणून संघाकडे फारसे पर्याय नाहीत. अशा स्थितीत अभिषेक शर्मा खेळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने अभिषेकला वगळले, तर संजू सॅमसनसह संघात कोण सलामी देणार हा मोठा प्रश्न असेल आणि अभिषेकला संघातून वगळले तर संघाचा समतोलही मोठ्या प्रमाणात बिघडू शकतो.


तिसऱ्या टी-20 सामन्याचा विचार केला तर ही मालिका जिंकण्यासाठी भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पुढील सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे, परंतु या सामन्यातही भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. भारतीय संघ गेल्या दोन सामन्यांमध्ये ज्या प्लेईंग इलेव्हनसह खेळला आहे ते उत्कृष्ट आहे. दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी कामगिरी केली नाही ही वेगळी बाब, पण संघात क्षमता आहे. कदाचित त्यामुळेच भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो.


तिसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.


अभिषेक शर्माचे टी-20चे आकडे  


अभिषेक पहिल्याच सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 100 धावा केल्या. यानंतर तो सतत फ्लॉप होत आहे. याशिवाय त्याने गेल्या 7 डावात 10, 14, 16, 15, 4, 7,4 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी 9 टी-20 सामन्यात 166 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतकही आपल्या नावावर केले आहे. मात्र, आयपीएल 2024 मध्ये या फलंदाजाची कामगिरी उत्कृष्ट होती. गेल्या मोसमात 16 सामने खेळताना त्याने 32.27 च्या सरासरीने 484 धावा केल्या होत्या. त्याने 3 अर्धशतकेही झळकावली. या कामगिरीमुळे त्याला टीम इंडियासाठी पदार्पणाची संधी मिळाली. मात्र त्याची खराब कामगिरी सुरूच आहे.