हरारे : शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील भारताची यंग ब्रिगेड आणि झिम्बॉब्वे यांच्यातील दुसरा टी 20 सामना सुरु आहे. कॅप्टन शुभमन गिलनं (Shubman Gill)आज टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल 2 धावा करुन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडनं भारताचा डाव सावरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दुसऱ्याच मॅचमध्ये अभिषेक शर्मानं अर्धशतक पूर्ण केलं. कॅप्टन शुभमन गिलनं काल अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मावर (Abhishek Sharma) विश्वास दाखवला अन् त्यानं तो सार्थ ठरवला. अभिषेक शर्मानं 45 बॉलमध्ये 100 धावांचा टप्पा गाठला. अभिषेक शर्मानं 8 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये शतक करणारा अभिषेक शर्मा दहावा खेळाडू ठरला आहे.


अभिषेक शर्माला पहिल्या मॅचमध्ये एकही रन करता आली नव्हती. आज अभिषेक शर्मानं डावाची सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रायन बेनेटला षटकार मारत केली होती. त्याचप्रमाणं मायर्सला षटकार मारत अभिषेक शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. अभिषेक शर्मानं 33 धावांमध्ये अर्धशतकाचा टप्पा पार केला. अभिषेक शर्मानं कालच्या अपयशातून सावरत आपली प्रतिभा दाखवून दिली. आजच्या खेळीतून अभिषेक शर्मानं आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये क्रिकेट खेळण्यास तयार असल्याचं  दाखवून दिलं आहे.पुढं अभिषेकनं अर्धशतकानंतर गिअर बदलत पुढच्या 12 बॉलमध्ये शतकापर्यंतचा टप्पा पूर्ण केला.


झिम्बॉब्वेला अभिषेक शर्माला जीवदान देणं महागात पडलं


अभिषेक शर्मा काल शुन्यावर बाद झाला होता. आज त्यानं दमदार फलंदाजी केली. अभिषेक शर्माचा कॅच झिम्बॉब्वेच्या खेळाडूंनी सोडला तो त्यांना महागात पडला. आज अभिषेक शर्मा आयपीएलमध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी करत होता त्या प्रकारे फटकेबाजी करताना पाहायला मिळाला.


ऋतुराज गायकवाडची साथ


एका बाजूनं अभिषेक शर्मा आक्रमक फलंदाजी करत असताना ऋतुराज गायकवाडनं संयमी खेळी करत त्याला साथ दिली. आठव्या ओव्हरला भारताच्या 50 धावा देखील झाल्या नव्हत्या. मात्र, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं 11 व्या ओव्हरमध्ये शंभर धावांचा टप्पा पार केला. अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडनं शंभर धावांची भागिदारी देखील केली.   



टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन - शुभमन गिल (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि मुकेश कुमार


झिम्बॉब्वेची प्लेईंग इलेव्हन - वेस्ली मधेवेरे, इनोसेंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कॅप्टन), डायोन मायर्स, जॉनाथन कैंपबेल, क्लाइव मैडेंडे (विकेटकीपर), वेलिंगटन मसाकादझै, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजरबानी  आणि  तेंदाई चटारा  


दरम्यान, झिम्बॉब्वेनं कालची मॅच जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आज भारतीय संघ विजय मिळवत मालिकेत बरोबरी करणार का हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या :


IND vs ZIM : झिम्बॉब्वेचा ऐतिहासिक विजय, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा 13 धावांनी पराभव, अपयशाची कारणं कोणती?


झिम्बॉब्वेनं इतिहास रचला, विश्वविजेत्या भारतीय संघाला पराभवाचा धक्का, वॉशिंग्टन सुंदरची झुंज अपयशी