Abhishek Sharma IND vs ENG 1st T20 : रोहित शर्मा हे नाव ऐकताच आपल्या मनात 'हिटमॅन' हा शब्द येतो. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर रोहितने छोट्या स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता टीम इंडियाला एक नवा 'हिटमॅन' मिळाला आहे. अवघ्या 24 वर्षांच्या या अभिषेक शर्माने इंग्लंड संघातही दहशत निर्माण केली आहे. नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कोलकात्यात पूर्णपणे नवीन रंग दाखवले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला.
अभिषेक शर्माने घातला धुमाकूळ
जुलै 2024 मध्ये अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले. अभिषेकने त्याच्या पदार्पणाच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. पण, यानंतर त्याची कामगिरी चढ-उतार होत राहिली. पण अलिकडेच त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाजीने धुमाकूळ घातला. आता त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात आपल्या फॉर्मची छाप सोडली.
अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 केल्या धावा
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावांची तुफानी खेळी करत भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले. त्याने यादरम्यान 8 षटकार अन् 5 चौकार मारले, म्हणजेच 13 चेंडूत 68 धावा ठोकल्या. अभिषेक बाद झाला तेव्हा भारताचा स्कोअर 125 धावांवर होता. त्याच्या बाद झाल्यानंतर, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याने भारताला लक्ष्य सहज पार केले. भारताने हा सामना 12.5 षटकांत म्हणजेच 43 चेंडू शिल्लक असताना जिंकला.
त्याआधी, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय यशस्वी ठरला आणि अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात फिल साल्टला आऊट केले. अर्शदीप सिंगने त्याच्या पुढच्या षटकात बेन डकेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे, तो भारतासाठी सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाजही बनला.
अर्शदीप सिंगने निर्माण केलेल्या दबावाचा इतर भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. सामन्याच्या आठव्या षटकात वरुण चक्रवर्तीने हॅरी ब्रूक (17) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (0) यांना बाद करून इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 65 अशी केली. या दबावाखालीही इंग्लिश कर्णधार जोस बटलरने चांगली खेळी करत 68 धावा केल्या. पण दुसऱ्या टोकाकडून सतत विकेट पडत राहिल्या.
25 धावांत गमावल्या 5 विकेट्स....
दबाव असूनही इंग्लंडने एका क्षणी 5 विकेटच्या मोबदल्यात 95 धावा केल्या. त्यावेळी तो 150 धावा करेल असे वाटत होते. पण हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 132 धावांवर ऑलआउट होण्यास भाग पाडले. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारताकडून वरुण चक्रवर्ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने 3 बळी घेतले.
हे ही वाचा -