Arshdeep Singh overtakes Yuzvendra Chahal : भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी एक मोठा विक्रम नोंदवला आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने टीम इंडियाला दमदार सुरुवात दिली. त्याने पहिल्या 2 षटकांत 2 बळी घेतले आणि इंग्लंडला बॅकफूटवर आणले. यासोबतच अर्शदीप सिंगने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही केला.
अर्शदीप सिंगने युजवेंद्र चहल टाकले मागे
अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या षटकात फिल साल्ट आणि दुसऱ्या षटकात बेन डकेटला आऊट केले. यासह, तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आणि नंबर-1 चे सिंहासन गाठले. अर्शदीपने युजवेंद्र चहलचा विक्रम मोडला. त्याच्या नावावर आता 97 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. चहलने भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 96 विकेट्स घेतल्या होत्या.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज :
अर्शदीप सिंग – 97 विकेट्स
युजवेंद्र चहल – 96 विकेट्स
भुवनेश्वर कुमार - 90 विकेट्स
जसप्रीत बुमराह – 89 विकेट्स
हार्दिक पांड्या - 89 विकेट्स
2022 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण
अर्शदीप सिंगने 2022 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तेव्हापासून तो भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणातील एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे. तो घरी खेळत असो किंवा परदेशात, त्याने सर्वत्र गोलंदाजीने आपली छाप सोडली आहे. 2024 चा टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्ड कपमध्ये त्याने 17 विकेट्स घेतल्या, भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
अर्शदीप सिंगने भारतीय संघासाठी 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत, त्याने कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
हे ही वाचा -