Gautam Gambhir Team India: टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती. तसेच हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार न बनवल्याने देखील विविध चर्चा रंगल्या आहेत. अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्यदेखील व्यक्त केलं आहे. तसेच गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारताच नवीन वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
1. हार्दिक पांड्याचे कर्णधारपद-
IPL 2024 मधील खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर हार्दिकने 2024 च्या टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली आणि त्याने ही जबाबदारी पार पाडली. पण श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्यात आले. हार्दिककडे अनुभव आहे, तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तरीही त्याला कर्णधार न केल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
2. शुभमन गिलला उपकर्णधार बनवले-
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वेचा मालिकेत 4-1 असा पराभव केला. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलचे उपकर्णधार होणे चर्चेचा विषय बनले आहे. गिल अवघा 24 वर्षांचा असून संघात त्याच्यापेक्षा अनुभवी खेळाडू आहेत. सूर्यकुमारला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघाचे कर्णधारपद दिले असते, तरीही हार्दिकला उपकर्णधार बनवता आले असते.
3. ऋतुराज आणि अभिषेकला संघात जागा नाही-
ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाले तर त्याला किमान टी-20 संघात स्थान द्यायला हवे होते, असं मत व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत त्याने टी-20 सामन्यांच्या 20 डावांमध्ये 39.5 च्या सरासरीने 633 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना त्याने दोन वेगवेगळ्या क्रमाने फलंदाजी करत तीन डावात 133 धावा केल्या. जिथे खेळाडूंना फलंदाजी करण्यास अडथळा येत होता, तिथे गायकवाड सातत्याने चांगली फलंदाजी करत होता. मात्र असे असतानाही गायकवाडला संघात स्थानही देण्यात आलेले नाही. दुसरीकडे, अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला असला तरी दुसऱ्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 100 धावा करत आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. अभिषेकने दाखवून दिले की तो अनुभव मिळवल्यानंतर आणखी चांगली कामगिरी करू शकतो. तरीही त्याला श्रीलंकेविरुद्धच्या संघात स्थान मिळालेले नाही.