Ind vs Ban 2nd T20: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशचा (India vs Bangladesh) 86 धावांनी पराभव केला. नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम खेळताना 221 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 135 धावाच करू शकला.
या विजयासह भारताने 2-0 ने मालिकाही जिंकली. मात्र हार्दिक पांड्याला गोलंदाजी न दिल्यामुळे नेटकरी चांगलेच संतापल्याचे दिसून येत आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एकूण सात जणांना गोलंदाजी दिली. यामध्ये नितीश रेड्डी, वरुण चक्रवर्ती आणि मयंक यादव यांनी प्रत्येकी 4 षटके टाकली. तर अर्शदीप सिंगने 3 षटके टाकली. यानंतर अभिषेक शर्मा आणि रियान परागने प्रत्येकी दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक षटक टाकले. इतके गोलंदाज वापरले जात असताना संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर ट्रोल-
हार्दिक पांड्याकडे गोलंदाजी न दिल्याने टीम इंडियाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. एका चाहत्याने सांगितले की, जो अष्टपैलू खेळाडू नेहमीच चर्चेत असतो, त्याला एकही षटक टाकायला दिले नाही, ही काय गोष्ट आहे. दुसरीकडे, ज्या बोर्डाने हार्दिकला त्याचे गोलंदाजी कौशल्य सुधारण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाठवले होते, परंतु येथे चेंडू त्याच्या हाती लागला नाही, असं म्हटलं आहे.
सामना कसा राहिला?
भारतीय संघाने बांगलादेशचा डाव 20 षटकांत 9 बाद 135 धावांवर रोखला. तडाखेबंद अर्धशतकासह 2 विकेट्स घेणारा नितीशकुमार रेड्डी सामनावीर ठरला. भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केल्यानंतर बांगलादेशचा अर्धा संघ 11 षटकांत 80 धावांवर गारद झाला. येथेच बांगलादेशचा पराभव स्पष्ट झाला. अनुभवी महमुद्दुल्लाहने 39 चेंडूंत 3 षट्कारांसह 41 धावांची झुंज दिली. त्याचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. नितीशकुमार आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.