Virat Kohli Test Cricket retirement: टीम इंडियाने लॉर्डसच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धचा हातातला सामना गमावल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात (Team India) स्थान मिळणार नसल्याच्या शक्यतेमुळे या दोघांनीही निवृत्ताचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र, आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघ 2-1 असा पिछाडीवर पडल्यानंतर विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन भारतीय कसोटी संघात परतावे, अशी मागणी होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (India Vs England Test Series)
राजीव शुक्ला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की, भारताच्या कसोटी संघात आम्हालाही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची उणीव जाणवत आहे. परंतु, विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्त होण्याचा निर्णय स्वत: घेतला होता. खेळाडूंच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयचे अत्यंत कठोर असे धोरण आहे. आम्ही कधीही कोणत्याही खेळाडूला कधी आणि कोणत्या प्रकारातून त्याने निवृत्त व्हावे, हे सांगत नाही. हा निर्णय ते खेळाडूच घेतात. त्याप्रमाणे विराट आणि रोहित या दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर आम्हाला कायमच त्यांची उणीव भासणार आहे. ते दोघेही महान फलंदाज आहेत, असे राजीव शुक्ला यांनी म्हटले.
राजीव शुक्ला यांच्या वक्तव्यामुळे विराट कोहलीच निवृत्तीचा निर्णय रद्द करुन पुन्हा भारतीय कसोटी संघात परतणार का, या चर्चेला आणखी उधाण आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुभवाचा फायदा तरुण खेळाडूंना होऊ शकतो. शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखालील संघ नवखा आहे. रवींद्र जडेजा हा एकमेव अनुभवी खेळाडू या संघात आहे. लॉर्डस कसोटीत जाडेजाने अनुभव काय असतो आणि आव्हानात्मक परिस्थिती कशी हाताळायची असते, हे दाखवून दिले होते. त्यामुळे भारताच्या कसोटी संघात विराट कोहली असला पाहिजे, असे अनेकांचे मत आहे. सध्या विराट कोहलीचा मुक्काम इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे त्याने लगेच भारतीय कसोटी संघात पुनरागमन करावे, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून होत आहे. मात्र, विराट कोहली या सगळ्याचा कितपत गांभीर्याने विचार करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा