Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) स्पर्धेत भारताच्या महिलांनी कांस्य पदक मिळवलं. दरम्यान यावेळी संघातील खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली ही देखील होती. नऊ महिन्यांची गर्भवली असताना हरिकाने संघासाठी खेळत भारताला पदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. 


मागील दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाईन पार पडलेली बुद्धिबळ ऑलिम्पियाड यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटाने कांस्य पदकाला गवसणी घातली. भारतीय संघातून कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी मिळून ही कामगिरी करुन दाखवली. यातील हरिका ही गर्भवती असतानाही तिने अशा स्थितीतही खेळत एक प्रेरणादायी उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.


9 महिन्यांची गर्भवती असतानाही करुन दाखवलं


ती विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेl म्हणाली, ''मी वयाच्या 13 व्या वर्षी भारतीय महिला बुद्धिबळ संघात पदार्पण करून आतापर्यंत खेळत आहे. 18 वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत 9 ऑलिम्पियाड खेळल्यानंतर भारतीय महिला संघासाठी पदक घेण्यासाठी पोडियमवर येणं माझं स्वप्न होतं. जे आता शेवटी यावेळी पूर्ण झाले आहे. त्यात मी 9 महिन्यांची गर्भवती असताना हे स्वप्न साकार झाल्याने हे अधिक भावनिक आहे. जेव्हा मी भारतात ऑलिम्पियाड आयोजित केल्याबद्दल ऐकले आणि तेव्हा माझ्या डॉक्टरांशी खेळण्याबाबत सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी तू योग्य काळजी घेऊन तणाव न घेता खेळू शकतेस तर खेळ. त्यामुळे संपूर्ण वेळ हा सराव आणि सामन्यात गेल्याने कोणतीच पार्टी, बेबी शॉवर तसंच सेलिब्रेशन करचा आलं नाही. पण मी ठरवलं की पदक जिंकल्यावरच मी सेलिब्रेशन करेल आणि अखेर मी हे करुन दाखवलं. भारतीय महिला बुद्धिबळ संघासाठी पहिले ऑलिम्पियाड पदक जिंकून दिले आहे.'' 


भारत-अमेरिकेत चुरशीची लढत


विशेष म्हणजे या स्पर्धेत युक्रेनने सुवर्ण तर जॉर्जियाने रौप्य पदक मिळवलं असून या दोघांविरुद्ध भारताने सामने गमावले नव्हते. त्यामुळे भारत गोल्ड मिळवले अशी शक्यता होती. पण अखेरच्या काही राऊंडमध्येतर भारत कांस्य पदक मिळवेल का? ही देखील शंका होती. पहिलं आणि दुसरं स्थान युक्रेन आणि जॉर्जिया यांनी मिळवलं होतं. पण तिसऱ्या स्थानासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात तगडी टक्कर होती. पण अखेर आकडे भारताच्या दिशेने झुकले आणि भारतीय महिलांनी कांस्य पदकावर नाव कोरलं.


पुरुषांच्या 'बी' संघालाही कांस्य


दुसरीकडे भारताच्या पुरुष गटातील बी संघानेही कांस्य पदक मिळवत आणखी एका पदकाला गवसणी घातली. डी. गुकेश नेतृत्त्व करणाऱ्या या संघात आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन, रौनक साधवानी, बी. अधिबन असे तगडे खेळाडू होते. त्यामुळे त्यांनी आपल्या दमदार खेळाने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. अखेरच्या सामन्यातही जर्मनी संघाला 3-1 ने मात देत भारताच्या बी संघाने कांस्य पदक खिशात घातलं.


हे देखील वाचा-