इंग्लंड : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या तुलनेत यजमान इंग्लंडचं पारडं जड मानलं जात आहे. याचं पहिलं कारण इंग्लंडचा संघ समतोल असून, त्यांनी साखळीत तिन्ही सामने जिंकले आहेत.
इंग्लंडचं पारडं जड असण्याचं दुसरं कारण इंग्लंड मायदेशात खेळत आहे. 2015 सालच्या वन डे विश्वचषकात इंग्लंडवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली होती. पण गेल्या दोन वर्षांत इंग्लंडनं वन डे क्रिकेटमध्ये कात टाकली आहे.
इंग्लंडनं मायदेशातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा 4-1 असा धुव्वा उडवला. याच मालिकेतल्या ट्रेन्ट ब्रिजच्या वन डेत इंग्लंडनं तीन बाद 444 धावांचा नवा विश्वविक्रम रचला होता.
बेन स्टोक्ससारखा जगाला हेवा वाटावा असा अष्टपैलू वीर आज इंग्लंडच्या ताफ्यात आहे. जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असा ज्यो रूटही इंग्लंडच्या संघात आहे. त्याशिवाय अॅलेक्स हेल्स, इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांच्याकडेही इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून देण्याची ताकद आहे. जेक बॉल, लियाम प्लन्केट आणि मार्क वूड यांच्या समावेशानं इंग्लंडच्या हाताशी धारदार वेगवान आक्रमण आहे.
धोकादायक पाकिस्तान
इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ बेभरवशाचा असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीतला सर्वात धोकादायक हा पाकिस्तानच आहे. कारण पाकिस्तानचं आक्रमण इतकं धारदार आहे की, प्रतिस्पर्धी संघावर कोणत्याही क्षणी बाजी उलटवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे.
मोहम्मद आमिर, जुनैद खान, हसन अली आणि फहिम अश्रफ असे चार चार वेगवान गोलंदाज पाकिस्तानच्या ताफ्यात आहेत.
सलामीच्या सामन्यात टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर हा संघ चवताळून उठला आहे. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांवर मिळवलेले विजय हा संघ किती ताकदीचा आहे, हेच दाखवणारे आहेत.
इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानची फलंदाज कमकुवत आहे. पण सलामीच्या फखर झमानच्या यशस्वी पदार्पणानं पाकिस्तानला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. अझर अली, सरफराज अहमद, मोहम्मद हफिज आणि शोएब मलिक यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार राहिल.