मुंबई : राज्य सरकारने छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना खरीपाच्या बी-बियाण्यांसाठी अडचण येऊ नये, यासाठी कर्जमाफी होईपर्यंत 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.


कर्जमाफीचा निर्णय झाला आहे. ती 8 दिवसात व्हावी, अशी अपेक्षा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीत मांडला. मात्र ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये बी-बियाण्यांसाठी द्यावे. ते नंतर कापून घ्यावे, मात्र आता तातडीने मदत मिळावी म्हणून हे 10 हजार द्यावेत, अशी मागणी केली, त्याला मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी बँकांशी बोलून या निर्णयाची अंमलबजावणी करतील. यामुळे सरकारच्या तिजोरीवरही भार येणार नाही. कारण उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला 40 हजार रुपये कर्ज मिळणार असेल, तर त्यापैकी 10 हजार रुपये अगोदरच दिले जातील आण नंतर कर्ज घेताना 30 हजार रुपये मिळतील.

खरीपासाठी बी-बियाणे घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीची घोषणा जरी करण्यात आलेली असली तरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ही रक्कम नंतर कर्जाच्या रक्कमेतून कपात केली जाईल.

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली आहे. मात्र कर्जमाफीचे निकष अजून ठरवले जाणार आहेत. त्यासाठी सरकारचे प्रतिनिधी, शेतकरी नेते आणि सर्वपक्षीयांची समिती निर्णय घेणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखी वेळ लागणार आहे.