मुंबई : सीबीएसई शाळांनी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचा तास अनिवार्य केल्याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आभार मानले आहेत. हे सर्वोत्तम बर्थ डे गिफ्ट असल्याच्या भावना सचिनने ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दररोज शारीरिक शिक्षणाचा एक तास अनिवार्य करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. देशभरातील 19 हजार शाळांमध्ये हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाचं स्वागत सचिनने केलं आहे.

'क्रीडा, आरोग्य आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या पाठीशी राहिल्याबद्दल बोर्डाचे आभार' अशा शब्दात सचिनने कौतुक केलं.


अभ्यासाच्या नादात विद्यार्थ्यांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. शारीरिक शिक्षण या विषयाची चाचणी घेण्यात येणार असून त्याचे गुण दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये ग्राह्य धरले जातील.

सचिन तेंडुलकरने मंगळवारी 45 वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी सीबीएसईने विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचा एक तास अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला होता.