मुंबई : महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाची इंग्रजी आवृत्ती 'महाराष्ट्र अहेड' एका चुकीमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या विशेष अंकात डॉ. आंबेडकर यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लहानपणीचा फोटो छापल्याने सोशल मीडियातून सरकारचे वाभाडे काढले जात आहेत. आंबेडकरी अनुयायी आणि विचारवंतांनी या अक्षम्य चुकीबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


शासनाचे मुखपत्र असलेल्या या चारही भाषेतील मासिकांचे कंटेंट आणि प्रकाशन शासनाच्या माहिती विभागाकडून केलं जातं. त्या माहिती विभागाला डॉ. बाबासाहेब यांची प्रतिमा माहित नसणे ही खेदाची बाब आहे, असं अभ्यासकांचं मत आहे. सरकारच्या प्रसिद्धीवर आणि विशेषतः जाहिरातबाजीवर केला जाणाऱ्या खर्चावरुन माहिती विभाग याआधीही चर्चेत आलं होतं. आता या गंभीर चुकीमुळे पुन्हा एकदा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

काय आहे लोकराज्य ?
महाराष्ट्र शासन आपल्या योजनांच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी अनेक उपक्रम राबवत आहे. यातील महत्वाचा भाग म्हणजे माहिती आणि जनसंपर्क संचनालयाच्या अंतर्गत प्रसिद्ध होणारं 'लोकराज्य' मासिक. लोकराज्यची सेवा सरकारने हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत देखील सुरु केली आहे. राज्य शासनाचं सर्वात जास्त खप असलेलं आणि खेड्या पाड्यात वाचलं जाणारं मासिक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून हे मासिक मोठ्या प्रमाणात वाचलं जातं.

माहिती व जनसंपर्क संचनालयाचं स्पष्टीकरण
लोकराज्य मासिकाची इंग्रजी आवृत्ती 'महाराष्ट्र अहेड' एका खासगी प्रकाशकाकडून छापण्यात येतं. यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. त्यांच्याकडून चुकीचा फोटो छापण्यात आला. ही चूक लक्षात येताच जनसंपर्क संचनालयाकडून या अंकाचं प्रकाशन आणि वितरण थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत चुकीची माहिती जाणार नाही, असा दावा विभागाने केला आहे.