Besiktas Fans Throw Toys On football Field : तुर्की देशामध्ये (Turkey Earthquake) 6 फेब्रुवारी रोजी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सर्व जग हादरलं. हजारो जणांना आपले प्राण गमवावे लागले असून कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. दरम्यान जगभरातून तुर्कीतील भूकंपग्रस्तांना मदत केली जात आहे. अशामध्ये तेथील चिमुरड्यांसाठी इस्तंबूल फुटबॉल क्लब बेसिक्टासच्या (Beşiktaş) चाहत्यांनी अनोखं दान केलं आहे. रविवारी झालेल्या एका फुटबॉल सामन्यादरम्यान भूकंपामुळे प्रभावित झालेल्या मुलांसाठी हजारो खेळणी मैदानावर टाकण्यात आली. या कठीण काळात प्रत्येकजण पीडित मुलांसोबत एकजुटीने उभा आहे, असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान या सर्वाचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरीही यावर भरभरुन प्रतिसाद देत आहेत.






ही संपूर्ण घटना तुर्की सुपर लीगच्या बेसिक्टास (Beşiktaş) आणि फ्रापोर्ट टीएव्ही अंतल्यास्पोर यांच्यातील सामन्यादरम्यान झाली. या खास कृतीसाठी तुर्की सुपर लीगचा सामना 4 मिनिटे आणि 17 सेकंदांनंतर थांबवण्यात आला. सामना अनिर्णित राहिला असला, तरी या अनोख्या प्रयत्नामुळे लाखोजणांची मनं मात्र जिंकली गेली आहेत. ब्रुकलिन कॉलेजमधील सहयोगी प्राध्यापक लुई फिशमन यांनी देखील हा व्हिडिओ ट्वीट केला आणि लिहिले, "तुर्कीमधील भूकंपानंतर बेघर झालेल्या मुलांसाठी फुटबॉल चाहत्यांनी खेळण्यांनी मैदान भरलं आहे. प्रेमाचं इतकं सुंदर आणि हृदयस्पर्शी दृश्य. जगातील लोकांचे हृदय किती मोठे आहे हे दाखवून देते.'' स्टेडियममधील हजारो चाहत्यांनी खेळणी आणि स्कार्फ मैदानावर फेकण्यास सुरुवात केली. ज्यानंतर खेळाडू आणि कर्मचारी हे सर्व उचलत असल्याचं देखील दिसून आलं. आता ही खेळणी भूकंपग्रस्त मुलांसाठी पाठवली जाणार आहेत.  






भारतासह इतर 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू 


6 फेब्रुवारी रोजी तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरू आहे.


हे देखील वाचा-