Ambabai Mandir : गेल्या अनेक वर्षांपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या (Ambabai Mandir) मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे. मूर्तीची अवस्था सध्या अत्यंत नाजूक झाली असून मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातून नव्हे, तर देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात. आईचं एक रूप पाहण्यासाठी हे सर्व भक्त दररोज रांगेत उभे असतात. मात्र, या आई अंबाबाईचे रूप आणि सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने झीज होत आहे. मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. दरम्यान, पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. मात्र मूर्तीचे पाय, कंबरेचा भाग, हात आणि चेहरा या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येते. दरम्यान, शास्त्राप्रमाणे भग्न झालेल्या मूर्तीचे पुजन करु नये, असे सांगितले जाते.


चेहऱ्यावरील भाव बदलला 


दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी देवीच्या ओठांना झालेली दुखापत लपवण्याठी तातडीने 18 आणि 19 सप्टेंबर रोजी एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर देवीचा चेहऱ्यावरील पूर्ण भावच बदलला. त्यानंतर 26 जानेवारी 2023 रोजी देवीच्या डाव्या कानाजवळील भाग निघाला. त्यामुळे श्रीपूजकांनी ही बाब 27 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. कोर्टानं या संदर्भात 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली होती. पण सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती कडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. यावरुनच सरकार, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग देवीच्या मूर्तीबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.


पुरातत्व विभागाला पाहणीसाठी कळवलं होतं, गेल्या आठवड्यात देखील पुरातत्व विभागाचे अधिकारी आले होते. मूर्तीच्या संवर्धनाबाबत त्यांचा अहवाल येईल, त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे असं देवस्थान समितीने म्हटलं आहे. दुसरीकडे, करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचा हा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तीच्या संदर्भात अनेकांनी आपली मतं नोंदवली आहेत. मूर्तीच्या संवर्धनासंदर्भातील पुन्हा एकदा विषय समोर आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नेमकं काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या