नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर, टीकाकारांनी कर्णधार विराट कोहलीला चांगलंच लक्ष्य केलं आहे. त्यातच आता प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही विराटवर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातले मंत्री जसे मोदी भक्त आहेत, तसेच बीसीसीआयचे अधिकारी कोहली भक्त  आहेत,’ असा टोला गुहा यांनी केला आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षक रवी शास्त्री यांना अतिशय कमकुवत प्रशिक्षक म्हणूनही गुहा यांनी संबोधलं आहे.


‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात गुहा यांनी टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीवरुन निशाणा साधला आहे. यातून त्यांनी प्रमुख्याने कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अधिकारी, निवडकर्ते, आणि कोचिंग स्टाफवरही सडकून टीका केली आहे.

“हे सर्वजण कोहली भक्तीत तल्लिन झाले आहेत. कोणताही निर्णय घेण्याआधी कर्णधार विराट कोहलीचा सल्ला घेणं, यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच टीम इंडियाला परदेशी दौऱ्यात यश मिळत नाही,” असा आरोप गुहा यांनी आपल्या लेखातून केला आहे.

विशेष म्हणजे, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यशैलीवरही गुहा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “रवी शास्त्रींसारख्या प्रशिक्षकांच्या कमकुवत बाजू देशाअंतर्गत झालेल्या मालिकांमध्ये झाकून जातात. पण आता परदेशी दौऱ्यात त्या समोर आल्या आहेत.” असं म्हटलं आहे.

शिवाय, निवडकर्त्याच्या कार्यप्रणालीवरही गुहा यांनी सडकून टीका केली आहे. गुहांनी म्हटलंय की, “सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांचा समावेश असलेली सल्लागार समिती, ज्याच्या कामकाजावर विनोद रायदेखील नाराज आहेत. त्यांनी अनिल कुंबळेला हटवून रवी शास्त्रीसारख्या सर्वसामान्य क्रिकेटपटूला प्रशिक्षक बनवलं. कारण, तो कर्णधाराचा अतिशय जवळचा आहे. वास्तविक, हे विराट कोहली समोर लोटांगण घालण्यासारखे आहे.”

गुहांनी पुढे म्हटलंय की, “प्रशिक्षक निवडीमध्ये, टॉम मूडीसारख्या अनुभवी क्रिकेटपटूचा पर्याय उपलब्ध होता. पण तरीही एका अशा व्यक्तीला प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं, ज्याला कोणताही अनुभव नाही, ज्याची क्रिकेटमधील कारकीर्द भलेही मोठी असली, तरी त्या कारकीर्दीत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.”

दुसरीकडे या लेखातून गुहा यांनी अनिल कुंबळेची स्तुती केली आहे. “कुंबळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा मॅच विनर बॉलर होता. त्याला आपली भूमिका पक्की महिती होती. त्यामुळे, तो प्रत्येकवेळेस कर्णधाराचं म्हणणं मान्य करत नव्हता. तो एकमेव व्यक्ती होता, ज्याने पदावर असताना विराट कोहलीच्या बरोबरीने काम केलं. त्यामुळे हे एकमेवच कारण असेल, ज्यामुळे त्यांना पदावरुन दूर करण्यात आलं.”

दरम्यान,  या लेखातून गुहा यांनी विराट कोहलीच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली असली, तरीही एक खेळाडू म्हणून त्याचं कौतुक केलं आहे. विराटच्या खेळाबद्दल लिहिताना त्यांनी म्हटलंय की, “विराट कोहली भारतातील एक महान फलंदाज नक्कीच आहे. तो कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करतो. त्याचा क्लासिक आणि ऑर्थोडोक्स खेळ कसोटी क्रिकेटमध्ये द्रविड आणि गावस्करच्या श्रेणीत घेऊन जातो.”



कोण आहेत रामचंद्र गुहा?

रामचंद्र गुहा हे एक प्रसिद्ध इतिहासकार आहेत. विशेष म्हणजे, लोढा समितीच्या शिफारसी बीसीसीआयमध्ये लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जी प्रशासकीय समिती स्थापन केली होती, त्यात रामचंद्र गुहांचा देखील समावेश होता. पण या समितीतून त्यांनी राजीनामा दिला.