बेळगाव : कर्नाटक सरकार, सगळे राजकीय पक्ष आणि कन्नड संघटना सीमाप्रश्नाच्या बाबतीत आक्रमक धोरण अवलंबत असताना सीमाप्रश्नाचे प्रभारी मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी तवग गावात कन्नड गीताच्या ओळी गायल्या. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना धक्का बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींची बैठक घेण्यास चंद्रकांत पाटील चालढकल करत असल्याचा आरोप आहे. मात्र त्यांनी गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांच्यासह हजेरी लावली.

मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर भाषणाची सुरुवात 'हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू' (जन्माला यायचे तर कर्नाटकात जन्म घ्यावा) या कन्नड गाण्याने करून उपस्थितांना खुश केलं. उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याची ओळ म्हटल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात नाराजीचे वातावरण पसरलं आहे. कन्नड गाण्याची ओळ सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी प्रतिक्रिया मराठी युवा मंचचे सुरज कणबरकर यांनी दिली.

चंद्रकांत पाटलांची सीमाप्रश्नाच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी करावी आणि त्या जागी मराठीचा स्वाभिमान असणारी व्यक्ती नियुक्त करावी, अशी मागणी मराठी भाषिक युवकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ''महाराष्ट्र भाजपाचं गुजराती प्रेम ज्ञात होतं, आता कन्नड प्रेमही उघड झालं. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी,'' असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.