Asia Cup : आशिया कपमधून भारतानं खरंच माघार घेतली का? BCCI ची अधिकृत भूमिका पहिल्यांदाच समोर,जाणून घ्या सत्य
BCCI on Asia Cup : भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 स्पर्धेत सहभागी होणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य दिलं आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळं वाढला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली होती.यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. ते प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले होते. यानंतर शस्त्रसंधी झाल्यानं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाला आहे. भारतानं सिंधू जल करार देखील स्थगित केला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघ आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेणार नाही अशा चर्चा सुरु होत्या. यासंदर्भातील काही बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी हे दावे फेटाळले आहेत. भारत आशिया कप खेळणार नाही या संदर्भातील बातम्या खोटया आहेत. आशिया कपमध्ये सहभाग घेण्यासंदर्भात कोणतीही बैठक झालीच नाही, निर्णय तर लांबच असं देवजीत सैकिया म्हणाले.
वृत्तसंस्था एएनआयच्या हवाल्यानं बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटलं की आज सकाळी आम्हाला बातमी समजली की बीसीसीआयनं आशिया कप आणि महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही स्पर्धा आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या अंतर्गत येतात. आतापर्यंतच्या स्थितीनुसार या बातम्यांमध्ये कोणतंही सत्य नाही, असं देवजीत सैकिया म्हणाले.
देवजीत सैकिया पुढं म्हणाले की आशिया कप स्पर्धेत सहभाग घेणे किंवा न घेणे या संदर्भात चर्चा झालेली नाही. आशिया क्रिकेट काऊन्सिलच्या इव्हेंट संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. बीसीसीआयचं पूर्ण लक्ष आयपीएल स्पर्धा आणि इंग्लंड विरूद्धच्या मालिकेवर आहे, असं देवजीत सैकिया म्हणाले.
देवजीत सैकिया काय म्हणाले?
BCCI Secretary Devajit Saikia to ANI says, "Since this morning, it has come to our notice about some news reports that the BCCI has decided not to participate in the Asia Cup and the Women's Emerging Teams Asia Cup, both of which are ACC (Asian Cricket Council) events. Such news… pic.twitter.com/U0fZ9t8Ykl
— ANI (@ANI) May 19, 2025
आशिया कप स्पर्धा कधी होणार?
यंदा 17 वी आशिया कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद कुणाकडे असेल या संदर्भात निर्णय झालेला नाही. या स्पर्धेत 8 संघ सहभाग घेतात. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग आणि यूएई या संघांचा समावेश आहे. महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपचं आयोजन श्रीलंका करणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं बांगलादेशला पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं. ही स्पर्धा पहिल्यांदा 2023 मध्ये झाली होती.























