नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. महेंद्र सिंह धोनी भारतीय संघात कधी पुनरागमन करणार याची वाट त्याचे चाहते पाहत आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने धोनीच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत बोलाताना म्हटलं की, धोनीने त्याच्या आगामी क्रिकेट भवितव्याबाबत आणि प्लानिंगबाबत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा नक्कीच केली असेल. त्यामुळे याविषयी बोलण्याची ही योग्य वेळ नाही, असं गांगुलीने म्हटलं.


धोनीची स्तुती करताना गांगुलीने म्हटलं की, धोनी टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. धोनी सारखा खेळाडू पुन्हा मिळणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या करिअरबाबत काय करायचं हा निर्णय धोनीला घ्यायचा आहे. मी धोनीशी बातचित नाही केली, मात्र तो भारतीय क्रिकेटचा चॅम्पियन आहे. धोनी सारखा खेळाडू आपल्याला लवकर मिळणार नाही. मात्र आता खेळायचं की नाही, याचा निर्णय धोनीला घ्यायचा आहे.


धोनीला त्याच्या पुढील वाटचालीबद्दल अनेकदा विचारण्यात आलं मात्र प्रत्येकवेळी त्याने उत्तर देणं टाळलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात टीम इंडियात पुनरागमनाबद्दल विचारलं असता, जानेवारी 2020 नंतर हा प्रश्न विचारा, असं धोनीने म्हटलं होतं. त्यामुळे धोनी नव्या वर्षात संघात परतेल, असे अंदाजही वर्तवले जात आहेत.


वर्ल्ड कपची सेमीफायनल अखेरचा खेळलेला सामना


आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना धोनीने खेळलेला शेवटचा सामना आहे. या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर झाली होती. विश्वचषकात धोनीच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. विश्वचषकानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी धोनीने आर्मी ट्रेनिंगला जाण्याचं कारण देत, वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये धोनी संघाचा भाग नव्हता. त्यामुळे धोनीच्या क्रिकेट करिअरबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र बीसीसीआय आणि धोनी याबाबत काय निर्णय घेणार आणि धोनी पुन्हा मैदानात कधी दिसणार याकडे क्रिकेट चाहत्यांचा लक्ष आहे.


धोनीने भारताला आपल्या नेतृत्त्वात 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यानंतर 2011 मध्ये तब्बल 28 वर्षानंतर धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं होतं. त्याआधी 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने विश्वचषक जिंकण्याची कमाल केली होती.


संबंधित बातम्या