मुंबई : चुनाभट्टी परिसरातील स्वदेशी मिल परिसरातील रेल्वे पूल मागील चार वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात आता स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. आत्तापर्यंत या ठिकाणी रेल्वेरुळ ओलांडताना चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रेल्वे अजून किती जणांचा बळी घेणार, असा थेट सवाल स्थानिकांनी विचारला आहे.


स्थानिकांच्या माहितीनुसार रेल्वेकडून 31 डिसेंबरच्या आत रेल्वेपूल तयार करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु आज अखेर रेल्वे प्रशासनाकडून याठिकाणी केवळ पीलर उभारण्यात आले आहेत. स्वदेशी मिल परिसरात याठिकाणी नागरिकांसाठी पादचारी पूल होता. परंतु तो धोकादायक स्थितीत असल्याचं कारण देत रेल्वे कडून 2014 साली पाडण्यात आला. त्यानंतर आजअखेर या पुलाचं काम रखडलेलं आहे.

“आम्ही याबाबत रेल्वेकड़े सतत पाठपुरावा करत आहोत. यासाठी रेल्वे प्रशासनासोबत आम्ही पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु आज पर्यंत आम्हांला केवळ आश्वासनं देण्यात आली”, असल्याचं कुर्ला रेल्वे प्रवाशी संघाचे उपाध्यक्ष विजय शिंदे यांनी सांगितले. तसेच मेगाब्लॉक मिळत नसल्यामुळे आम्हांला काम करता येतं नसल्याचं उत्तर रेल्वेकडून देण्यात आलं आहे.

पूल नसल्यामुळे आत्तापर्यंत चार तरुणांचे बळी गेले आहेत. आमच्या परिसराचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या परिसरात ना कोणती वैद्यकीय सुविधा आहे ना शाळेची सुविधा आहे. यासाठी आम्हांला रात्री-अपरात्री धोकादायक रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूला जावे लागते. जर अशावेळी एखादी आपत्कालीन परिस्थिती आली तर आमच्याकडे कोणताचं पर्याय नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. तसेच रेल्वेने 31 डिसेंबरपर्यंत पूल पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. ते न झाल्यास आम्ही या विरोधात उग्र आंदोलन करु असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

पूल नसल्यामुळे स्थानिक जेष्ठ महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘मला हृदय विकाराचा आणि गुडघे दुखीचा त्रास आहे. मला दवाखान्यात जाण्यासाठी आम्हाला रेल्वेरुळ ओलांडून जाणं अवघड होतं’ असल्याचं स्थानिक जेष्ठ महिलांनी सांगितलं. तसेच याबाबत आम्ही स्थानिक नगरसेविका यांच्यासोबत रेल्वे अधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यांनी आम्हांला लवकरच पूलाचं काम करुन देऊ असं आश्वासन दिलं, परंतु आजपर्यंत काम ' जैसे थे' आहे.