नवी दिल्ली : बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीच्या निवृत्तीसंदर्भातल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. धोनीच्या निवृत्तीची बातमी पूर्णपणे चुकीची आहे असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे.


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं एका सामन्यातला धोनीसोबतचा फोटो ट्विट केला होता. 'मी तो सामना कधीच विसरु शकत नाही. ती रात्र खूप खास होती. धोनीनं त्यावेळी मला फिटनेस टेस्टवेळी पळवतात तसं पळवलं होतं.' अशा आशयाच्या कोहलीच्या ट्विटवरुन सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक अफवा उठल्या होत्या. इतकंच नव्हे तर धोनी गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आपली निवृत्ती जाहीर करेल असे मेसेजही सोशल मीडियात फिरु लागले होते.


पण एमएस के प्रसाद यांनी धोनीकडून अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्यानं निवृत्तीची बातमी चुकीची असल्याचं स्पष्ट केलं. प्रसाद यांच्यासह धोनीची पत्नी साक्षीनंही ट्विट करुन या केवळ अफवा असल्याचं सांगितलं.


खरं तर विराटनं ट्विट केलेला तो फोटो 2016 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला आहे. त्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतानं ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय साजरा केला होता. धोनी आणि कोहलीनं एकेरी आणि दुहेरी धावांच्या साहाय्यानं १६१ धावांचं आव्हान लिलया पार केलं होतं.