मुंबई : बीसीसीआयचे नवनियुक्त लोकपाल डी. के. जैन यांनी बीसीसीआयच्या सल्लागार समितीतल्या सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या माजी कसोटीवीरांना हितसंबंधांच्या मुद्यावरुन नोटीस बजावली आहे. सचिन तेंडुलकर हा आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सचा, तर व्हीव्हीएस लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबादचा मेन्टॉर म्हणून सक्रिय आहेत.

याच मुद्यावरून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीलाही नोटीस बजावण्यात आली आहे. सौरव यंदाच्या मोसमापासून दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे.

बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य या नात्याने त्या तिघांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती केली होती. जस्टीस लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयच्या प्रशासनात दुहेरी हितसंबंधांना मनाई करण्यात आली आहे.

28 एप्रिलपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश सचिन आणि लक्ष्मण यांना देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.