Jimmy Neesham : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला. आज (28 ऑक्टोबर) धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडसमोर 389 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांना नऊ विकेट्स गमावून 382 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियन संघाचा हा सलग चौथा विजय ठरला, तर न्यूझीलंडचा सहा सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला.


जिम्मी निशम धावबाद आणि जागेवरच बसला!


सामन्याच्या शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 19 धावा करायच्या होत्या. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने धाव घेतली. तर मिचेल स्टार्कने दुसऱ्या चेंडूवर पाच धावा (वाइड + चार) दिल्या. म्हणजे आता न्यूझीलंडला पाच चेंडूत 13 धावा करायच्या होत्या. पुढच्या तीन चेंडूंवर जिम्मी नीशमला 2-2 धावा करता आल्या. इथून जिंकण्यासाठी न्यूझीलंडला दोन चेंडूत सात धावांची गरज होती. दोन धावा करण्याच्या प्रयत्नात असताना पाचव्या चेंडूवर नीशम धावबाद झाला आणि किवी संघाच्या आशा मावळल्या. न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर सहा धावा करायच्या होत्या, पण लॉकी फर्ग्युसनला एकही धाव काढता आली नाही.






49.5 षटकात जिमी नीशमचा धावबाद हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता, ज्याने 48 चेंडूत 58 धावा करून कांगारूंच्या जबड्यातून विजय जवळपास हिसकावून घेतला होता. नीशमच्या आधी, भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रने स्पर्धेतील आपले दुसरे शतक झळकावले, परंतु संघाला विजयापर्यंत नेण्यापूर्वी तो बाद झाला. पुन्हा एकदा फिरकीपटू अॅडम झाम्पाने ऑस्ट्रेलियासाठी चमत्कारिक गोलंदाजी करत तीन मौल्यवान बळी घेतले. नीशम धावबाद झाल्यानंतर त्याला निराशा लपवता आली नाही. काही काळ हातातील ग्लोव्हज बाजूला करून तो गुडघ्यावर बसला. 






भारताला झाली 2019 च्या सेमीफायनलची आठवण!


2019 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड भारतासाठी कर्दनकाळ झाला होता. सेमीफायनलमध्ये अत्यंत अटीतटीच्या आणि दोन दिवस झालेल्या लढतीत भारताचा पराभव झाला होता. या सामन्यातही टीम इंडियाचा फिनिशर अत्यंत मोक्याच्या क्षणी धावबा झाला आणि भारताच्या हातून सामना निसटला. आजही न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजयी होणार होता, पण जिम्मी निशम धावबाद झाला आणि स्वप्न भंगले. या पराभवाने न्यूझीलंडला धक्का बसला, तरी त्यांच्या वर्ल्डकप मोहिमेवर फरक पडणार नाही. मात्र, सलग दोन पराभव झाल्याने निश्चितच मानसिक दबाव वाढला आहे. 






दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत प्रथमच, ऑस्ट्रेलियाने सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 350+ धावा केल्या आणि न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतील चौथा विजय नोंदवला.


इतर महत्वाच्या बातम्या