मुंबई : ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट शहरात राष्ट्रकुलातल्या खेळाडूंचा मेळा सजला आहे. निमित्त आहे एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं. या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून, त्यात 19 क्रीडाप्रकारांमध्ये मिळून तब्बल 275 सुवर्णपदकं पणाला लागतील. भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.


2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं

2006... मेलबर्न... 50 पदकं

2010... दिल्ली... 101 पदकं

2014... ग्लास्गो... 64 पदकं

आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी 225 शिलेदारांचं भारतीय पथक सज्ज झालं आहे. एशियाड आणि ऑलिम्पिकच्या धर्तीवर राष्ट्रकुलातल्या 71 देशांसाठी दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारा मल्टिगेम इव्हेण्ट म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा.

एका जमान्यात ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेल्या देशांचा हा क्रीडामेळा न्यूझीलंडच्या हॅमिल्टनमध्ये पहिल्यांदा भरला तो 1930 साली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत पहिल्यांदा सहभागी झाला 1934 साली लंडनमध्ये. पण भारताचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला सहभाग खऱ्या अर्थानं उठून दिसला तो एकविसाव्या शतकात.

मॅन्चेस्टर... मेलबर्न... दिल्ली... आणि ग्लास्गोतल्या सलग चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मिळून भारतीय खेळाडूंनी तब्बल 284 पदकांची लूट केली. त्यामुळे साहजिकच गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातून भारताच्या खजिन्यात किती पदकं जमा होतात, याविषयी क्रीडारसिकांच्या मनात नक्कीच उत्सुकता आहे.

गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 19 क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी 14 क्रीडाप्रकारांमध्ये भारताचा सहभाग आहे. पण भारताला प्रामुख्यानं पदकांची अपेक्षा आहे ती अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, स्क्वॉश आणि वेटलिफ्टिंग या खेळांमधून.



अॅथलेटिक्समध्ये भारताला भालाफेकपटू नीरज चोप्रा, थाळीफेकपटू सीमा पुनिया आणि उंच उडीतली अॅथलीट तेजस्विनी शंकर यांच्याकडून पदकाची आशा आहे.

बॉक्सिंग रिंगमध्ये भारताची मदार ही प्रामुख्यानं विकास कृष्णन आणि एमसी मेरी कोमवर राहील.

बॅडमिंटनच्या कोर्टवर ऑलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू, ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवाल यांच्यासह किदम्बी श्रीकांतवर भारतीय क्रीडारसिकांचं लक्ष राहील.

नेमबाजीत हिना सिद्धू, जीतू राय, मनू भाकेर यांचा अचूक लक्ष्यवेध भारताचं भाग्य उजळू शकतो.

कुस्तीच्या मॅटवर सुशीलकुमार, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि राहुल आवारे ही भारताची आशास्थानं असतील.

स्क्वॉश कोर्टवर दीपिका पाल्लिकल, जोशना चिन्नाप्पा आणि सौरव घोषाल हे भारतीय त्रिकूट वर्चस्व गाजवेल अशी चिन्हं आहेत.

वेटलिफ्टिंग हा क्रीडाप्रकार भारतासाठी पदकांची खाण ठरु शकतो आणि त्याची सुरुवात विश्वविजेती मीराबाई चानूकडून होईल, असा विश्वास आहे.

गोल्ड कोस्टच्या रणांगणात भारतीय खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदककमाई नक्कीच उंचावलेली दिसेल. जकार्तातल्या आगामी एशियाडच्या दृष्टीनंही ती कामगिरी भारतीयांचा आत्मविश्वास उंचावणारी ठरेल.