सांगली : मारहाणीप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिसांनी भाजपच्या तीन नगरसेवक आणि 14 अनोळखी व्यक्तींसह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला. नगरपालिका पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.

नगरपालिका पोटनिवडणुकीच्या वार्ड क्र. सहात प्रचार करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली. यात पोलिसही जखमी झाले. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. या हाणामारीत तलवारीसह, रिव्हॉल्वर, काठी, गज यांचा वापर करण्यात आला. यामध्ये पाच पोलिस गंभीर जखमी झाले.

तासगावात दोन राजकीय पक्षात झालेल्या राड्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांनाही मारहाण झाली. या मारहाणीत पोलीस गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे तत्काळ तासगावमध्ये हजर झाले.

त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलिसांना मारहाण करणार्‍यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती, तर दंगल नियंत्रण पथक पहाटेच तासगावमध्ये दाखल झालं होतं.

दरम्यान, सोमवारी झालेल्या राजकीय राड्यानंतर आता गुरुवारी राष्ट्रवादीचं होणारं हल्लाबोल आंदोलन आणि शुक्रवारी होणारी पोटनिवडणूक ही तणावपूर्ण झाली आहे. सोमवारी रात्री तासगाव शहरात पोलिसांवर हल्ला झाला. यावेळी खासदार संजय पाटील घटनास्थळी हजर होते. या मारामारी प्रकरणी खासदार संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुमन पाटील यांनी निवेदनाद्धारे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे केली.