सॅन ब्रुनो, कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियात यूट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला हल्लेखोराच्या गोळीबारात काही जण जखमी झाले असून महिलेने अखेर स्वतःलाही गोळी झाडून संपवलं.


चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांना गोळी लागली आहे, तर एकाला पळताना दुखापत झाली.

यूट्यूब ही जगातील सर्वात मोठी व्हिडिओ वेबसाईट आहे. कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनोमध्ये असलेल्या यूट्यूबच्या मुख्यालयात मंगळवारी हा हल्ला झाला. यूट्यूबची मालकी गूगलकडे आहे.

महिला हल्लेखोर यूट्यूबची कर्मचारी होती का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्ल्याचं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही.

हल्ल्याबाबत गूगलकडून कर्मचाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यातून कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे ट्विटरवरुन आभार मानले. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ट्विटरवरुन कर्मचाऱ्यांना संदेश दिला आहे.