Asian Taekwondo Championships : व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई तायंक्वादो अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकल्याचा मला अभिमान आहे. या कांस्यपदकामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला पदक मिळवून देण्याची स्वप्नपूर्ती झाल्याचा मला मोठा आनंद झाला. फेडरेशनचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, प्रशिक्षक अभिषेक दुबे यांनी सर्वोत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यामुळे मला पदकाचा पल्ला निश्चितपणे गाठता आला, अशा शब्दात कांस्यपदक विजेती रूपा बायोर हिने आपल्या यशाचे श्रेय फेडरेशनला दिले आहे. तिने पुमसे गटातील वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. या स्पर्धेतील क्योरूगी प्रकारात रूदाली बरूआ हिने 73 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले.


अरुणाचल प्रदेश येथील रूपा या युवा खेळाडूने पुमसे या सर्वात आव्हानात्मक गटात भारताला कांस्यपदक  मिळवून दिले. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही चमक दाखवण्याची रूपा हिच्याकडे क्षमता होती. जर भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या सहकार्याने प्रवेशिका मिळाली असती तर आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील भारताला ऐतिहासिक पदक नोंदविता आले असते.


आशियाई स्पर्धेतील सांघिक विभागातही भारतीय खेळाडूंनी रुपेरी यश संपादन केले. या  या स्पर्धेमध्ये भारताला दहा वर्षांनी पहिल्यांदाच पदकांची कमाई झाली आहे.


कांस्यपदक विजेत्या रुपा बायाेरच्या कामगिरीला उजाळा देत सीता, हर्षा सिंघा, उषा धामणस्कर यांनी सांघिक विभागात भारतीय संघासाठी पदकांचे दुहेरी यश संपादन केले. या तीनही नैपुण्यवान खेळाडूंनी सर्वाेत्तम कामगिरी नोंदवली  आणि पुमसे खेळ प्रकारात भारतीय संघाला राैप्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. 
या स्पर्धेतील क्योरूगी प्रकारात रूदाली बरूआ हिने 73  किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले. दहा वर्षापूर्वी लतिका भंडारी हिने या प्रकारात कांस्यपदक मिळविले होते. 


ज्या प्रकारात रूपा व रूदाली यांनी पदके जिंकली, त्या क्रीडा प्रकारांच्या लढती आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही आयोजित केल्या जातात.ही गोष्ट लक्षात घेतली तर या दोन्ही खेळाडूंची कामगिरी अतुलनीय आणि अन्य युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आहे.


ऐतिहासिक पदक प्रेरणादायी : शिरगावकर
भारतीय संघातील खेळाडूंनी अथक परिश्रमातून हे ऐतिहासिक पदक मिळवले आहे. यात कामगिरीतून रूपाने कांस्यपदक पटकावले. यामुळे हे इतिहास रचणारे पदक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. तसेच रूदाली हिचे पदकही अभिमानास्पद आणि अपेक्षा उंचावणारे आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी कसून तयारी केली  होती. हे पदक सर्वांसाठी अभिमानास्पद ठरलेले आहे, अशा शब्दात अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी काैतुकाचा वर्षाव केला.